थंडीला सुरूवात होताच अचानक कुठे गायब होतात साप आणि पाली? पाहा असतं नेमकं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:58 IST2025-11-11T12:20:53+5:302025-11-11T12:58:38+5:30
Interesting Facts : हिवाळा आला की आपण उबदार ब्लॅंकेटमध्ये शिरून जातो, पण तुम्हाला माहीत नसेल की, सरडे, साप, बेडूक हे सगळे प्राणीही कुठेतरी अचानक गायब होतात.

Interesting Facts : कधी लक्षात आलंय का, की जसजशी थंडी वाढते तसतशी भिंतींवर धावणाऱ्या पाली, सरडे किंवा शेतात दिसणारे साप अचानक गायब होतात? ते शेवटी जातात कुठे? त्यांच्या अशा लुप्त होण्यामागे नेमकं कारण काय असतं?

हिवाळा आला की आपण उबदार ब्लॅंकेटमध्ये शिरून जातो, पण तुम्हाला माहीत नसेल की, सरडे, साप, बेडूक हे सगळे प्राणीही कुठेतरी अचानक गायब होतात. त्याला म्हणतात 'नैसर्गिक रजई'. ज्यात ते शिरतात. म्हणजे बाहेरच्या तापमानात घट होताच साप, पाली आणि बेडूक जमिनीखालील बिळांमध्ये, झाडांच्या पोकळीत किंवा फटींमध्ये लपून जातात आणि महिनाभर काही न खाता, न हलता, जणू खोल झोपेत राहत असतात.

थंडी वाढली की साप-सरडे का गायब होतात?
एक्सपर्ट सांगतात की, सापांसारखे जीव शीतरक्तीय (cold-blooded) असतात. म्हणजे त्यांचं शरीर स्वतःचं तापमान नियंत्रित करू शकत नाही. बाहेर थंडी वाढली की त्यांचं शरीरही थंड पडतं आणि ते निष्क्रिय होतात. म्हणूनच ते बिळांत, दगडांच्या फटीत किंवा झाडांच्या मुळांखाली जाऊन हायबरनेशन मोड मध्ये जातात.

हिवाळ्यात सापांचं काय होतं?
कोब्रा, करैत, रसेल वायपरसारखे विषारी साप हिवाळ्यात बिळांत खोलवर लपून राहतात. अजगरासारखे मोठे साप कधीकधी उन्हात शरीर तापवायला बाहेर येतात, पण हे फारच क्वचित दिसतं. थंडीच्या काळात एखादा साप दिसला, तर समजावं की त्याच्या खोल झोपेत खंड पडल्यामुळे तो बेचैन झाला आहे.

फक्त सापच नाही इतर प्राण्यांनाही झोप लागते
थंडीत अनेक जीव हायबरनेशन करतात. बेडूक तळ्याच्या चिखलात स्वत:ला गाडून घेतात. कासव पाण्याखाली शांत बसून राहतात. सरडे झाडांच्या किंवा भिंतींच्या फटीत लपतात. ही त्यांची ऊर्जा वाचवण्याची आणि स्वतःला थंडीपासून संरक्षित ठेवण्याची अनोखी पद्धत आहे. म्हणूनच हिवाळ्यात हे कुठेच दिसत नाहीत.

कधी पुन्हा बाहेर येतात?
प्राणी विशेषज्ञ सांगतात की, फेब्रुवारीच्या शेवटी तापमान वाढतं, आणि हे जीव झोपेतून हळूहळू बाहेर येऊ लागतात. मार्चपर्यंत बहुतेक साप, सरडे आणि बेडूक पुन्हा सक्रिय होतात. पावसाळ्यात मात्र बिळांमध्ये पाणी भरतं, तेव्हा यांना बाहेर यावं लागतं. म्हणूनच ते घरात किंवा शेतात दिसायला लागतात.

थंडीमध्ये प्राणी दिसत नसले म्हणजे गायब झाले असे नाही. ते फक्त निसर्गाच्या आदेशानुसार स्लीप मोड मध्ये गेलेले असतात. त्यांच्या दृष्टीने ही झोप केवळ आराम नसून जगण्यासाठीची एक टेक्निक असते.

















