जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:12 IST2025-12-31T13:01:08+5:302025-12-31T13:12:17+5:30

या जगात एक असेही बेट आहे, जिथे लोक अन्नासोबत चक्क तिथली माती खातात.

जगात खाण्यापिण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत. कुठे मसालेदार पदार्थांची ओढ असते, तर कुठे कच्च्या अन्नाला पसंती दिली जाते. मात्र, या जगात एक असेही बेट आहे, जिथे लोक अन्नासोबत चक्क तिथली माती खातात. ऐकायला विचित्र वाटेल, पण ही शेकडो वर्षे जुनी परंपरा आजही या बेटावर तितक्याच आवडीने जपली जात आहे. इराणच्या दक्षिण भागात वसलेल्या या बेटाची माती चवीला कशी आहे आणि लोक ती का खातात, याची रंजक माहिती समोर आली आहे.

इराणच्या दक्षिणेला इराणच्या आखातात 'होर्मुज आयलंड' नावाचे एक छोटेसे बेट आहे. हे बेट केवळ त्याच्या धोरणात्मक स्थानासाठी नाही, तर तिथल्या रंगीबेरंगी जमिनीसाठी जगप्रसिद्ध आहे. या बेटाला 'रेनबो आयलंड' असेही म्हणतात, कारण इथे निसर्गाचे तब्बल ७० हून अधिक रंग पाहायला मिळतात. मात्र, यातील सर्वात खास आकर्षण म्हणजे इथली लाल रंगाची माती!

होर्मुज बेटावर आढळणाऱ्या या लाल मातीला स्थानिक भाषेत 'गेलक' असे म्हटले जाते. या मातीचा रंग इतका गडद लाल आहे की, तुम्हाला आपण मंगळ ग्रहावर तर आलो नाही ना? असा भास होतो. इथले लोक ही माती केवळ पाहत नाहीत, तर ती खातात.

ब्रेड, मासे, स्थानिक सॉस आणि अगदी चपातीसोबतही ही माती मसाला म्हणून वापरली जाते. ज्यांना या मातीची चव माहित आहे, त्यांच्या मते ही माती चवीला हलकी खारट, थोडी गोड आणि खनिजांनी समृद्ध वाटते.

शास्त्रज्ञांच्या मते, या मातीत 'आयर्न ऑक्साइड' आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत. जुन्या काळात जेव्हा मीठ किंवा इतर मसाले सहज उपलब्ध नसायचे, तेव्हा अन्नाला चव आणण्यासाठी आणि शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी लोकांनी या मातीचा वापर सुरू केला. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

स्थानिकांच्या मते, मर्यादित प्रमाणात ही माती खाल्ल्याने आरोग्याला अपाय होत नाही. निसर्गाचा अनमोल ठेवा या बेटावरचे सौंदर्य इतके विलक्षण आहे की, जेव्हा समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकतात, तेव्हा समुद्राचे पाणीही लाल रंगाचे दिसते. हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि संशोधक इथे गर्दी करतात.

मात्र, इथल्या निसर्गाचे नुकसान होऊ नये म्हणून इराण सरकारने बेटावरून माती किंवा दगड बाहेर नेण्यास कडक बंदी घातली आहे. परंपरा आणि निसर्गाचे हे अतूट नाते होर्मुज बेटाला जगातील इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि रहस्यमय बनवते.