सैनिकाच्या डोक्यात गोळी लागली, सुदैवाने जीव वाचला पण आयुष्यभर 'या' आजाराने ग्रासले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:04 PM2021-11-11T17:04:30+5:302021-11-11T17:07:26+5:30

या व्यक्तीला नेमका कोणता आजार झाला, हे त्या काळात कोणत्याही डॉक्टरला सांगता आले नाही.

झोप आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. झोपेशिवाय आपल्या शरीराला एनर्जी मिळत नाही. एक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सुमारे 25 वर्षे झोपेत घालवते. पण, पृथ्वीवर असा एक माणूस होता, जो आपल्या आयुष्यात कधीच झोपला नाही. हा व्यक्ती पहिल्या महायुद्धाच्या काळातला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पहिल्या महायुद्धात पॉल केर्न या हंगेरियन सैनिकाच्या मेंदूच्या पुढच्या भागामध्ये गोळी लागली होती. या भीषण घटनेत त्याचा जीव वाचला, पण त्याची कायमची झोप उडाली. त्या व्यक्तीला आयुष्यभर झोपचं आली नाही. गोळी लागलेला मेंदुचा समोरचा भाग काढून टाकल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा झोप का लागली नाही हे आजपर्यंत कोणालाही समजू शकले नाही.

इनसाइडरच्या बातमीनुसार, पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर तरुण पॉल केर्न लाखो हंगेरियन देशवासियांसह हंगेरियन सैन्यात सामील झाला. 1915 मध्ये रशियाविरुद्धच्या युद्धात रशियन गोळी त्याच्या डोक्यावरून गेली. जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले. या घटनेत सुदैवाने त्याचा जीव वाचला, पण केर्नने 1955 पर्यंत एकदाही झोप घेतल नाही. म्हणजेच सुमारे 40 वर्षे तो झोपू शकला नाही.

जे लोक निद्रानाशाच्या समस्येशी झुंजायला लागतात, त्यांना भ्रम आणि व्यक्तिमत्त्वात बदल जाणवतो. झोप न लागल्याने प्रयोगशाळेत उपस्थित उंदरांचाही मृत्यू झाल्याचे सिद्ध झालंय. परंतु पॉल केर्न यांना 40 वर्षांपासून यापैकी कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. त्यांच्या या विचित्र आजाराबद्दल त्या काळात कुठल्याही डॉक्टराकडेही इलाज नव्हता.

एका रिपोर्टनुसार, केर्नवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते केर्नने बऱ्याच ठिकाणी उपचार घेतला, पण त्याला आपल्या समस्येवर उपचार मिळालाच नाही. ऑस्ट्रियापासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये पॉल केर्नचे एक्स-रे करण्यात आले, पण गोळी झाडल्यानंतर काय झाले, याचे अचूक उत्तर कोणताही डॉक्टर देऊ शकला नाही.