काय सांगता! हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्यांना कोरोना व्हायरससोबत लढणं जाईल सोपं, पण कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:49 PM2020-07-03T15:49:59+5:302020-07-03T16:25:39+5:30

तज्ज्ञांना या रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या लोकांनी भयंकर आणि कठिण परिस्थितींना सिनेमांच्या माध्यमातून पाहिले असेल ते कोरोनाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे पेलू शकतात.

लाइट बंद करून, रात्री मित्रांसोबत हॉरर सिनेमे तर खूपदा बघितले असतील. हे सिनेमे पाहताना सर्वात जास्त घाबरलेल्या मित्रांना तर अनेक दिवस चिडवलंही असेल. पण आता त्याचा फायदा तुम्हाला आता कोरोना काळात होऊ शकतो. एका रिसर्चमधून एक अनोखा दावा करण्यात आला आहे.

मानसोपचारतज्ज्ञांच्या एका टीमने केलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, एक खासप्रकारचे सिनेमे आणि टीव्ही सीरिज बघणारे लोक इतर लोकांच्या तुलनेत कोरोना व्हायरस महामारीचा चांगल्याप्रकारे सामना करू शकतात.

तज्ज्ञांना या रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या लोकांनी भयंकर आणि कठिण परिस्थितींना सिनेमांच्या माध्यमातून पाहिले असेल ते कोरोनाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे पेलू शकतात. (https://www.newscientist.com/article/2247744-horror-movie-fans-are-better-at-coping-with-the-coronavirus-pandemic/ या लिंकवर तुम्ही रिसर्च वाचू शकता)

रिसर्च करणाऱ्या तज्ज्ञांनी 310 लोकांच्या सिनेमांची आवड पाहिली आणि त्यांना प्रश्न विचारले. यादरम्यान त्यांना असं आढळून आलं की, ज्या लोकांना हॉरर सिनेमे आवडतात, त्यांच्यात कोरोना व्हायरससारख्या महामारीसोबत मनोवैज्ञानिक रूपाने निपटण्याची क्षमता होती. (Image Credit : www.cosmopolitanme.com)

रिसर्चमधून हे समोर आलं की, भीतीदायक सिनेमे पसंत करणारे लोक अडचणींतून लवकर बाहेर येण्याची क्षमता ठेवतात. सोबतच एलियन अटॅक, महामारीचे सिनेमे, झोंबी सिनेमे बघणाऱ्या लोकांमध्ये कठिण परिस्थितीतून लवकर बाहेर येण्यासोबतच चांगली तयारीही दिसली.

तज्ज्ञांनी सांगितले की, असं नाही की, कोरोना महामारीने असे सिनेमे बघणाऱ्यांना फरक पडणार नाही. पडणार..पण इतर लोकांच्या तुलनेत त्यांना कमी संघर्ष करावा लागेल म्हणजे या लोकांना मानसिक दबाव फार जास्त पडणार नाही.

लोकांना विचारण्यात आलेल्या या प्रश्नांमध्ये मानसोपचारतज्ज्ञांच्या टीमने असे प्रश्न ठेवले, ज्यातून लोकांची सिनेमाची आवड जाणून घेऊन त्यांची महामारी आणि बचावाबाबतची जिज्ञासा परखली जावी. हे मोजण्यासाठी तज्ज्ञांनी Pandemic Psychological Resilience Scale (PPRS) चा वापर केला.