'त्या' हिरव्या मुला-मुलीचं रहस्य आजही कायम, खरंच ते दुसऱ्या विश्वातून आले होते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:08 PM2020-05-14T15:08:35+5:302020-05-14T15:19:45+5:30

त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा होता आणि सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ते अशी भाषा बोलत होते जे कुणालाही समजत नव्हती. सोबतच त्यांचे कपडेही वेगळे होते.

ही पृथ्वी जेवढी सुंदर आहे तेवढीच ती रहस्यमय आहे. नेहमीच इथे असे काही रहस्य समोर आले आहेत ज्याने लोक हैराण झाले आहेत. एक असंच आश्चर्यकारक रहस्य म्हणजे 'वूलपिटमधील हिरवी मुले'. वूलपिट हे इंग्लंडमधील एक गाव आहे.

ही घटना 12व्या शतकातील आहे. पण कोणत्या वर्षातील आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यावेळी इंग्लंडवर राजा स्टीफनचं राज्य होतं. त्याच्याच शासनकाळात एक दिवस वूलपिटमध्ये अशी घटना घडली होती, जी आजही रहस्य राहिलेल्या अनेक घटनांपैकी एक आहे. (Image Credit : http://eclectariumshuker.blogspot.com)

उन्हाळ्याचे दिवस होते. लोक आपापल्या शेतात काम करत होते. अशात गावातील लोकांनी अचानक विचित्र दिसणाऱ्या एका मुलाला आणि एका मुलीला पाहिलं.

त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा होता आणि सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ते अशी भाषा बोलत होते जे कुणालाही समजत नव्हती. सोबतच त्यांचे कपडेही वेगळे होते.

त्या दोघांनाही गावातील लोक जमिनदाराकडे घेऊन गेले. तिथे त्यांना जेवायला देण्यात आलं. पण त्यांनी ते खाल्लं नाही. त्यांना तिथे जवळच एका झाडाला शेंगा दिसल्या त्यांनी त्याच कच्च्या खाल्ल्या. अनेक दिवस असंच सुरू राहिलं. दोघेही केवळ शेंगा खात होते.

काही महिन्यांनी ते सामान्य खाद्य पदार्थ खाऊ लागले होते. पण त्यांची भाषा काही कुणाला समजत नव्हती. अशात मुलगा काही कारणाने आजारी पडला आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मात्र, मुलगी ठिक होती.

असे सांगितले जाते की, कालांतराने मुलीच्या त्वचेचा हिरवा रंग हळूहळू गायब झाला आणि ती सामान्य मनुष्याप्रमाणे दिसू लागली. सोबत ती इंग्रजी बोलणंही शिकली. त्यानंतर तिने तिची हैराण करणारी कहाणी सर्वांना सांगितली.

तिने सांगितले की, ती आणि तिचा भाऊ सेंट मार्टिन नावाच्या एका ठिकाणाहून आले होते. हे ठिकाण जमिनीच्या आत आहे. तिथे सूर्यप्रकाश कधीच येत नाही. केवळ धुसर प्रकाश होता. तिने हेही सांगितल्याचा दावा केला जातो की, सेंट मार्टिन लॅन्डमधील सगळेच लोक हिरव्या रंगाचे होते.

आता ही घटना खरी आहे की कथा हे तर कुणाला माहीत नाही. पण वूलपिटचे लोक या घटनेला खरी मानतात. तेव्हाच इथे एक लोखंडी खांब आणि त्यावर बोर्ड आहे. या बोर्डावर दोन्ही मुलांना दर्शवण्यात आलं आहे.