नशीबवान! निर्दयी आई-बापाने चिमुकलीला बॉक्समध्ये गंगेत सोडलं, नशीबाने मिळालं 'दुसरं आयुष्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:33 PM2021-06-16T12:33:21+5:302021-06-16T12:39:32+5:30

गंगा नदीत एका बॉक्समध्ये देवी-देवतांच्या फोटोंसहीत हे बाळ सापडणं सध्या गाजीपुरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली किंवा वाचली असेल. या म्हणीला साजेशी अशी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये गंगा नदीत एक बॉक्स सापडला. धक्कादायक बाब म्हणजे या बॉक्समध्ये एक जिवंत नवजात चिमुकली आढळून आली.

गंगा नदीत एका बॉक्समध्ये देवी-देवतांच्या फोटोंसहीत हे बाळ सापडणं सध्या गाजीपुरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. गंगा नदीच्या किनारी ददरीघाटावर राहणारा गुल्लू चौधरी मल्लाहला गंगा नदीत एक वाहून आलेला बॉक्स दिसला. जेव्हा त्याने बॉक्स उघडून पाहिला तर त्यात त्याला एक सुंदर बाळ दिसलं. हे बाळ ओढणीत गुंडाळलेलं होतं. तसेच बॉक्समध्ये देवी-देवतांचे फोटोही होते.

गुल्लू चौधरी या बाळाला घरी घेऊन आला आणि काही लोकांनी मोबाइलमध्ये बाळाचे फोटो काढले. माहिती मिळाल्यावर पोलीस गुल्लू चौधरीच्या घरी पोहोचले आणि बाळाला त्यांनी ताब्यात घेतलं. मात्र, यादरम्यान गुल्लू चौधरी आणि त्याचा परिवार गंगा नदीचा प्रसाद म्हणून बाळाचं पालन पोषण करण्यावर अडून बसला होता.

गुल्लू चौधरीची बहीण सोनीने सांगितलं की, तिच्या भावाला हे बाळ गंगा नदीच्या किनाऱ्यावर एका बॉक्समध्ये सापडलं आणि सोबत काही देवी-देवतांचे फोटोही होते. बॉक्समध्ये मुलीची पत्रिकाही होती.

तिने सांगितलं की, कुंडलीनुसार मुलीचं नाव गंगा आहे आणि जन्म तारीख २५ मे आहे. ती केवळ तीन आठवड्यांची आहे. दरम्यान गुल्लू चौधरीने सांगितलं की तो गंगा नदीत नाविक म्हणून काम करतो.

तो म्हणाला की, रविवारी गंगा किनारी एका बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मी बघायला गेलो तर लाकडी बॉक्समध्ये एक चिमुकली रडत होती. ही चिमुकली पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या ओढणीत गुंडाळलेली होती. बॉक्समध्ये तिच्यासोबत काही देवी-देवतांचे फोटोही होते.

स्थानिक लोकांनुसार, प्राथमिक पाहणीत हे प्रकरण तंत्र-मंत्राचं दिसत आहे. कारण मुलीसोबत पूजेचं साहित्य आणि तिची पत्रिकेत गंगा नाव लिहिलं होतं. त्यासोबतच जन्मतारीखही लिहिली आहे.

काही तज्ज्ञांनुसार, काही लोक अंधश्रद्धेच्या नादात देवाच्या नावाने अशाप्रकारे चिमुकल्यांना नदीत सोडून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. हा अमानविय प्रकार अनेकदा बघायला मिळतो. अशात पोलिसांनी सांगितले की, मुलीचं मेडिकल चेकअप करून तिच्या पालकांचा शोध घेणं सुरू आहे.