Doctors Day : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर; ज्यांनी वयाच्या ९ व्या वर्षीच माप ओलांडले, 'एक' संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:25 PM2020-07-01T13:25:22+5:302020-07-01T13:45:07+5:30

आनंदी बाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर सगळ्यांनाच माहीत आहेत. आत्तापर्यंत इंटरनेटवर किंवा पुस्तकांमध्ये चित्रपटात तुम्हाला आनंदी बाई जोशीं यांचा परिचय झाला असेल. अनेक संकटांचा सामना करत आनंदीबाई जोशी यांनी त्या काळात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.

आज १ जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवस आज साजरा केला जातो. सध्या कोरोनाच्या माहामारीत डॉक्टरर्स महत्वाची भूमिका बचावताना दिसून येत आहेत. या निमित्ताने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या आनंदीबाई जोशींची सगळ्यांनाच आठवण होते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ मध्ये झाला.

वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठ्या असलेल्या संगमनेरच्या गोपाळराव जोशी यांच्याशी संपन्न झाला. आनंदीबाईंचे लग्नाआधीचे नाव यामुना होते. लग्नानंतर गोपाळरावांनी यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.त्या काळात महिला डॉक्टर नसल्यामुळे दवाखान्यात जाऊन प्रसूती केली जात नसे. महिलांच्या प्रसूती घरीच होत असत.वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, पण उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा प्रसंग आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

महिलांनी घरात बसून राहण्यापेक्षा शिक्षण घ्यावे असे नेहमीच गोपाळरावांना वाटत होते. गोपाळरावांनी आनंदीबाईना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला.

त्यानंतर आनंदीबाईंनी भाषेचे ज्ञान सुद्धा आत्मसाद केले. अनेक तडजोडींचा सामना करत गोपाळरावांना आनंदी बाईंना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याचे ठरवले पण गोपाळरावांना अमेरिकेत जाणे शक्य नव्हते.

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि शिक्षणासाठी धर्मांतर करणे त्यांना मान्य नव्हते. अनेक प्रयत्नांनंतर आनंदीबाईना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता वयाच्या १९ व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये प्रवेश मिळाला.

त्या काळात आनंदीबाईच्या डॉक्टर होण्याला समाजाकडूनही खूप मोठा विरोध झाला. कष्टाच्या जोरावर मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना अखेर एम.डी.ची पदवी मिळाली. या संपूर्ण प्रवासात त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता.

६ नोव्हेंबर १८८६ रोजी जेव्हा आनंदीबाई भारतात परतल्या. कालांतराने त्यांना टीबी चीचा आजार झाला. उपचारांअभावी या आजारपणात २६ फेब्रुवारी १८८७ रोजी आनंदीबाई जोशीचे निधन झाले. आनंदीबाई यांच्या जीवनप्रवास दाखवणारा आनंदी गोपाळ हा मराठी चित्रपट गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला.

Read in English