'या' ठिकाणी होते बुलेट गाडीची पूजा, सर्व इच्छा होतात पूर्ण; काय आहे यामागचं नेमकं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 01:09 PM2020-01-26T13:09:04+5:302020-01-26T13:14:06+5:30

जोधपूर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालीजवळ चोटीला गावात रस्त्याशेजारी मोठं मंदिर बनविण्यात आलं आहे. याठिकाणी देवी-देवतांचे नव्हे तर बुलेट बाइकची पूजा केली जाते. सर्वसामान्य लोकचं नव्हे तर पोलीससुद्धा याठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. काय आहे या मंदिराचं रहस्य जाणून घेऊया,

बाइकची पूजा होणारं मंदिर ओम बन्ना नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये नवयुवकांना बन्ना म्हणून संबोधलं जातं. ओम बन्ना यांचे पूर्ण नाव ओमसिंह राठोड आहे. ते पाली शहराजवळीत चोटीला गावातील ठाकूर जोगसिंह राठोड यांचे सुपुत्र होते. १९८८ मध्ये बुलेटवरुन परतताना एका रस्त्याच्या दुर्घटनेत ओम बन्ना यांचा जागीच मृत्यू झाला.

सासरवाडीहून परतताना रात्री उशीर झाला. त्यावेळी रात्रीच्या अंधारात एका झाडाला आदळून ओम बन्ना यांच्या गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, घटनास्थळीच ओम बन्नाचा मृत्यू झाला.

स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्याठिकाणी ओम बन्ना यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या ठिकाणी नेहमी अपघात होत असत, इथं झालेल्या अनेक अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. ओम बन्ना यांच्या अपघातानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह आणि बाइक पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

ओम बन्नाच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला देण्यात आली. कुटुंब त्यांचा मृतदेह घेऊन घरी घेऊन आले. अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ओम बन्ना यांच्या घरी पोलीस कर्मचारी आले त्यांनी बाइक घेऊन आलाय का अशी विचारणा केली. त्यावर कुटुंबाने नकार दिल्यानंतर अपघातातील बुलेटचा शोध घेतला तर ती बुलेट घटनास्थळावर आढळून आली.

पोलिसांनी पुन्हा ही बाइक घटनास्थळावरुन पोलीस ठाण्यात आणली. परत दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. पोलिसांनी संशय आल्याने पोलिसांनी या बाइकला लोखंडी साखळीने बांधून ठेवले. त्यावर पहारा दिला. त्यावेळी बंदोबस्तांनी असलेल्या पोलिसांनी पाहिलं की, लोखंडी साखळी आपोआप तुटली बाइक सुरु झाली अन् घटनास्थळावर पुन्हा गेली. त्यानंतर पोलिसांनी ही बाइक ओम बन्ना यांच्या घरी उभी केली. त्यानंतर पुन्हा ही बाईक घटनास्थळावर जाऊन पोहचली.

वारंवार असा प्रकार घडत असल्याने ओम बन्ना यांच्या वडिलांनी घटनास्थळी चौथरा बांधून ओम बन्ना यांची शेवटची इच्छा म्हणून बाइक तिथेच ठेवली. ज्यावेळपासून ही बाइक याठिकाणी उभी आहे तेव्हापासून याठिकाणी एकही अपघात झाला नाही असं लोकांचं म्हणणं आहे. याठिकाणाहून जाणाऱ्या अनेकांना ओम बन्नाची प्रचिती आल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याने जाणारे नेहमी ओम बन्ना यांच्या मंदिरात दर्शन घेऊन जातात. सांगितलं जातं की, मृत्यूनंतर ओम बन्ना अद्यापही याठिकाणी असून ते अपघात होणाऱ्या लोकांचे जीव वाचवतात.