Amber Luke : हौस की वेडेपणा? शरीराच्या ९८% भागावर टॅटू, ३ आठवडे गेली दृष्टी; तरुणीचं वेदनादायी आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:34 IST2026-02-16T19:27:38+5:302026-02-16T19:34:51+5:30
Amber Luke : ३० वर्षीय तरुणीच्या टॅटूच्या आवडीने तिचं आयुष्य अत्यंत कठीण बनलं आहे.

ऑस्ट्रेलियामधून एक अजब घटना समोर आली आहे, एका ३० वर्षीय तरुणीच्या टॅटूच्या आवडीने तिचं आयुष्य अत्यंत कठीण बनलं आहे. एम्बर ल्यूक ही ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक टॅटू असलेली महिला म्हणून ओळखली जाते.


त्वचेवर टॅटू काढण्यासोबतच एम्बरने अनेक 'बॉडी मॉडिफिकेशन' (शरीरात बदल) केले आहेत. तिने आपल्या डोळ्यांमध्ये निळा रंग भरला आहे. डोळ्यांत टॅटू काढण्याच्या अनुभवाबद्दल एम्बर सांगते की, हा अनुभव अत्यंत वेदनादायी होता.

या प्रक्रियेत झालेल्या एका छोट्या चुकीमुळे तिची दृष्टी ३ आठवड्यांसाठी गेली होती. याशिवाय तिने आपली जीभ मध्यभागातून कापली आहे (Split Tongue) आणि कपाळावर शिंगे देखील बसवली आहेत.

एम्बरने टॅटू काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. आतापर्यंत टॅटू आणि सर्जरीसाठी तिने सुमारे £१७७,००० (जवळपास १.९ कोटी रुपये) खर्च केले आहेत.

एम्बरच्या म्हणण्यानुसार, तिने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पहिला टॅटू काढला होता आणि तेव्हापासून हे सुरू झालं आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्याने तिने टॅटूच्या जगाला आपलं मानलं.

टॅटूमुळे तिला स्वतःला स्वीकारण्यास मदत झाली, पण जग मात्र तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते.एम्बरच्या या टॅटू प्रवासामागे तिचं मानसिक आरोग्य हे मोठं कारण आहे.

एम्बर सांगते की, ती दीर्घकाळापासून 'बॉडी इमेज' आणि स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक समस्यांशी झुंजत होती. अशा परिस्थितीत टॅटू तिच्यासाठी एखाद्या थेरपीसारखे ठरलं.

इतकंच नाही तर २०२१ मध्ये एम्बर ल्यूकला ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात तुरुंगवास होणार होता, परंतु तिची मानसिक स्थिती लक्षात घेता तिला उपचारांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला.

















