रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:17 IST2025-10-19T10:09:20+5:302025-10-19T10:17:49+5:30
Rocket Science: केवळ रॉकेटच आकाशात का उडते, इतर फटाके का नाहीत यामागे एक विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे, जे रॉकेटच्या रचनेत दडलेले आहे.

दिवाळी म्हटलं की घराघरात दिव्यांची रोषणाई आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी! यात 'रॉकेट' हा सर्वात लोकप्रिय फटाका आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की सर्वच फटाक्यांमध्ये दारु असताना, केवळ रॉकेटच इतक्या वेगाने उंच आकाशात का झेपावते? याचे उत्तर आहे थेट विज्ञानात आणि न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमात!
केवळ रॉकेटच आकाशात का उडते, इतर फटाके का नाहीत यामागे एक विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे, जे रॉकेटच्या रचनेत दडलेले आहे.
न्यूटनचा 'क्रिया-प्रतिक्रिया' नियम
रॉकेट उंच उडण्यामागे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियमकार्यरत असतो. हा नियम सांगतो: "प्रत्येक क्रियेची (Action) समान आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते."
रॉकेटमध्ये हे कसे घडते?
विशिष्ट रचना: रॉकेटमध्ये इतर फटाक्यांसारखा दारू असते, पण त्याला अरुंद नोजल किंवा खालच्या दिशेने उघडणारे तोंड असते.
खालील बाजूस स्फोट: जेव्हा रॉकेट पेटवले जाते, तेव्हा दारू जळून तीव्र वेगाने गरम वायू तयार होतात. हे वायू रॉकेटच्या खालच्या दिशेने असलेल्या नोजलमधून वेगाने बाहेर पडतात.
क्रिया : रॉकेटच्या आतून स्फोटाने वायू खालील दिशेने (जमिनीच्या दिशेने) ढकलले जातात. ही झाली क्रिया.
प्रतिक्रिया : न्यूटनच्या नियमानुसार, या क्रियेला समान आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया बळ मिळते. हे बळ रॉकेटला वरच्या दिशेने ढकलते, ज्यामुळे ते वेगाने आकाशात उडते.
इतर फटाके का उडत नाहीत?
इतर फटाक्यांमध्येही दारू असते, पण त्यांची रचना वेगळी असते. उदाहरणार्थ, लवंगी किंवा इतर आवाजाचे फटाके.
इतर फटाक्यांमध्ये दारू जळाल्यावर तयार होणारी ऊर्जा किंवा वायू एकाच दिशेने बाहेर न पडता चारही दिशांना पसरतात. यामुळे, रॉकेटला मिळतो तसा एकवटलेला आणि तीव्र 'प्रतिक्रिया दाब' इतर फटाक्यांना मिळत नाही. परिणामी, ते केवळ आवाज करून जमिनीवरच फुटतात.
अशा प्रकारे, रॉकेटची विशिष्ट रचना आणि न्यूटनचा तिसरा नियम एकत्र येऊन रॉकेटला आकाशाची सफर घडवून आणतात. त्यामुळे यंदा दिवाळीत रॉकेट उडवताना, त्यामागील हे विज्ञान नक्की आठवा!