Alaska at High Temperature: संकटाचे वारे; अलास्काचे तापमान पोहोचले 19.4C अंशावर, तज्ज्ञांनी व्यत केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:07 PM2021-12-30T17:07:43+5:302021-12-30T17:14:46+5:30

अमेरिकेतील अलास्का पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. पण, आता हवामान बदलामुळे या ठिकाणचे तापमान 19.4C पर्यंत वाढले आहे. या अनुचित प्रकाराने हवामान तज्ज्ञही हादरले आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अलास्का पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. पण, आता हवामान बदलामुळे या ठिकाणचे तापमान 19.4C पर्यंत वाढले आहे. या अनुचित प्रकाराने हवामान तज्ज्ञही हादरले आहेत.

गरम वाऱ्यांमुळे अलास्कातील तापमान 20 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर या भागात मुसळधार बर्फवृष्टी आणि पाऊसही पडत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील वाहतूकीवर मोठा परिणाम झालाय.

रविवारी तापमान 19.4 नोंदवण्यात आले. हे तापमान अलास्कातील कोडियाक बेटांवर नोंदवले गेले. डिसेंबरमधील अलास्कातील हे सर्वाधिक तापमान आहे.

अलास्कातील शास्त्रज्ञ रिक थॉमन यांनी तापमानातील हा बदल अनाठायी असल्याचे म्हटले आहे. अलास्काच्या आत डिसेंबर महिना खूप कोरडा असतो, परंतु रविवारी या भागात खूप बर्फ पडला आहे.

यादरम्यान, मुसळधार पाऊस आणि त्यानंतर मुसळधार हिमवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण परिसर बर्फाच्या थराने झाकला गेलाय.

यामुळे संपूर्ण परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आणि प्रमुख रस्ते आणि कार्यालये बंद झाली. आगामी काळात रस्ते धोकादायक स्थितीत येऊ शकतात, असा इशारा अलास्का वाहतूक विभागाने दिला आहे.

पृथ्वीच्या वातावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आर्क्टिक बर्फ मानवी लोभाचा बळी ठरला आहे. अलास्का देखील एक संलग्न क्षेत्र आहे.

हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा आर्क्टिक बर्फ झपाट्याने वितळत आहे. आर्क्टिकवर पृथ्वीच्या विध्वंसाची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. 2050 च्या उन्हाळ्यापर्यंत या मार्गावरुन बर्फ पूर्णपणे नाहीसा होईल, असा अंदाज या संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे.

सर्वात मोठी समस्या ही आहे की, हवामान बदल कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे बर्फ तयार होणार नाही. नासा समुद्रातील बर्फावर सातत्याने संशोधन करत आहे.

या संस्थेने 1978 पासून संशोधन केले असून सप्टेंबरमध्ये समुद्रात सर्वात कमी आणि मार्चमध्ये सर्वाधिक बर्फ असल्याचे आढळून आले आहे. जरी अचूक आकडेवारी वर्षानुवर्षे बदलत असली तरी आर्क्टिकमधील समुद्रातील बर्फाचे नुकसान दरवर्षी वाढत आहे.