Narendra Modi Net Worth: ना शेअर्स, ना म्युचुअल फंड्स; ना कार आणि जमीन; तिसऱ्यांदा पीएम बनणाऱ्या मोदींची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:32 AM2024-06-10T08:32:55+5:302024-06-10T08:48:33+5:30

Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदी यांच्यासाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज पाहूया नरेंद्र मोदी यांची संपत्ती आहे तरी किती?

Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदी यांच्यासाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सायंकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनात मंत्रिमंडळासह त्यांना शपथ दिली.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी १ जून २०२४ रोजी पंतप्रधानांनी आपली संपत्ती, गुंतवणूक आणि बँक बॅलन्सचा तपशील निवडणूक आयोगाला दिला होता. विशेष म्हणजे त्यांनी शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन किंवा प्रॉपर्टीमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेटवर्थवर किती आहे?

गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी आपली एकूण संपत्ती जाहीर केली होती. यामध्ये त्यांनी सोनं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (एफडी) गुंतवणूक केल्याची माहिती जाहीर केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीचं मूल्य जवळपास ५० लाख रुपयांनी वाढलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्रात ३.०२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. २०१९ मध्ये २.५१ कोटी आणि २०१४ मध्ये १.६६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम अधिक आहे.

त्यांच्या मालमत्तेत जंगम आणि स्थावर मालमत्ता, तसंच विविध गुंतवणुकीचा समावेश आहे. त्यांचे प्रतिज्ञापत्र १४ मे रोजी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते.

२०२४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान मोदींकडे २.६७ लाख रुपयांचं सोनं आहे. हे सोनं चार सोन्याच्या अंगठ्यांच्या स्वरूपात आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

२०१९ मधील ७.६१ लाख रुपयांच्या तुलनेत यात सुमारे २ लाख रुपयांची वाढ दिसून येते. त्याच्याकडे एफडीमध्ये २.८५ कोटी रुपये आहेत.