घरातील हवा शुद्ध आणि खेळती ठेवा, आजपासूनच फॉलो करा या टिप्स, राहाल जास्त हेल्दी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 03:58 PM2021-07-25T15:58:08+5:302021-07-25T16:23:34+5:30

कित्येकदा असं आढळून येतं की, घरात शिरताक्षणीच आपल्याला अस्वस्थता, डोकेदुखी जाणवू लागते आणि याला घरातील प्रदूषित हवा कारणीभूत ठरू शकते. याचा आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे का?

घरात स्वच्छतेसाठी अथवा आरामदायी वातावरणासाठी अनेक गोष्टींचा आपण सातत्याने वापर करीत असतो. वरवर छोटय़ा वाटणाऱ्या या गोष्टींची जर योग्य तऱ्हेने काळजी घेतली तर घरातील हवा प्रदूषित होण्यापासून निश्चितपणे रोखू शकू, त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे.

हल्ली बदलत्या काळानुसार घराची रचना ही अत्याधुनिक स्वरूपाची होऊ लागली आहे. त्यामुळे अशा घरात कित्येकदा मोठमोठाल्या खिडक्या असल्या तरी हवा खेळती (व्हेन्टिलेशन) राहण्याच्या दृष्टीने योग्य ती सोय नसते. परिणामी घरातील हवा कोंदट होते. त्यामुळे नवीन घर घेताना अथवा नव्याने घराची पुनर्रचना करताना तेथील हवा खेळती राहील याकडे नीट लक्ष द्यावे.

बाथरूम, शौचालयातदेखील हवा येण्याजाण्याची योग्य सोय असावी. वेळोवेळी तेथील पाइप, सांडपाण्याच्या पाइपांची सफाई करावी. असे न केल्यास तिथे कचरा साचून विशिष्ट स्वरूपाचा घातक गॅस तयार होऊ लागतो. असा गॅस घरातील हवेत मिसळल्यास घरातील हवा तर प्रदूषित होतेच; शिवाय अनेक प्रकारचे विकारदेखील उद्भवू शकतात.

या जागांसह घरातील इतर गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी रसायनं किंवा कीटकनाशके वापरली जातात. ती योग्य तऱ्हेने तपासून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यामार्फत घातक स्वरूपाचे गॅस बाहेर पडत नाही ना, याची शहानिशा करून घ्यावी. कारण हे गॅस घरातील हवा प्रदूषित करायला पुरेसे असतात.

स्वयंपाकघरात व्हेंटीलेशनची खास काळजी घ्या. गॅस सिलिंडर्समधून निघणारे वायू काही प्रमाणात बाहेरील हवेमध्ये विरघळतात. ज्यामुळे आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकते.

घरात कारपेट असल्यास त्याची व्हॅक्युम क्लीनरच्या साहाय्याने आठवडय़ातून एकदा तरी स्वच्छता करावी. कारण वरवर ते स्वच्छ वाटत असले तरी त्यातील धाग्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर धूळीचे कण अडकलेले असतात.

खिडक्यांवरील जाळ्या, पडदे यांचीदेखील नियमितपणे स्वच्छता करावी. त्यासाठी आवश्यक त्या साधनांचा वापर करावा. उगाच जोरजोराने ब्रश घासून ते स्वच्छ करू नयेत.

अनेकजण बाहेरून घरात येताना थेट चपला घालूनच आपण घरात प्रवेश करतो. या चपलांमार्फत रस्त्यावरच्या धुळीसकट अनेक सूक्ष्म जीवजंतू सहजपणे आपल्या घरात शिरतात. त्यामुळेच घराच्या प्रवेशदाराजवळ अशी काही सोय अथवा जागा करावी, जेणेकरून चपलांमधील धूळ त्यावर झटकून मगच आपण घरात प्रवेश करू शकू. अन्यथ चपला बाहेर ठेवण्याची सोय करावी.

घरातील उशा, त्यांचे आभ्रे, सोफा कव्हर यांचीदेखील नियमितपणे स्वच्छता करावी. कारण या ठिकाणी नुसतीच धूळ अडकून राहात नाही तर तिथे सूक्ष्म जंतू मोठय़ा प्रमाणावर अडकून राहतात.

नडोअर झाडे घरात लावण्यापेक्षा बाल्कनीमध्येच ठेवा. हल्ली बाजारात अशी काही शोभिवंत झाडे मिळतात, ज्यामुळे धूळ थेटपणे घरात शिरत नाही.