World's Dirtiest Man Died: जगातील सर्वात घाणेरडा माणूस, ५० वर्षांनी अंघोळ करताच आजारी पडला, मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:24 IST2022-10-26T10:19:52+5:302022-10-26T10:24:41+5:30
पाणी आणि साबन आजारी करू शकते, या भीतीने त्याने एवढी वर्षे अंघोळच केली नव्हती.

जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीचा वयाच्या ९४ व्या वर्षी मृत्यू झाला. जवळपास पाच दशकांनी अंघोळ करणाऱ्या य़ा व्यक्तीचा अंघोळीनंतर काही महिन्यांतच मृत्यू झाला. त्याने जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ पाणी आणि साबनाचा वापर केला नव्हता.

अमौ हाजी असे या जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचे नाव होते. त्याला पाणी आणि साबन आजारी करू शकते, या भीतीने त्याने एवढी वर्षे अंघोळच केली नव्हती. तो तेहरानच्या दक्षिणी भाग फारसमध्ये राहत होता. स्थानिक गावकऱ्यांनी त्याला अनेकदा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता, परंतू त्याने नकार दिला होता. काही महिन्यांपूर्वी अशाच दबावापोटी त्याने अंघोळ केली आणि आजारी पडला.

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अंघोळ केल्यानंतर काही दिवसांनी तो आजारी पडला आणि रविवारी त्याचा मृत्यू झाला. 2014 मध्ये तेहरान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हाजीने सांगितले होते की, त्याचे आवडते अन्न पोर्क्युपाईन आहे. तसेच तो खड्ड्यात विटांनी बनविलेल्या एका झोपडीत राहतो. अनेक वर्षांपासून अंघोळ न केल्यामुळे हाजीची त्वचा काळी पडली होती. त्याच्या आहारात कुजलेले मांस आणि घाणेरडे पाणी असे.

अनेक जुन्या फोटोंमध्ये तो सिगारेट ओढताना दिसत आहे. एका चित्रात हाजी एकाच वेळी चार सिगारेट ओढताना दिसत आहे. त्याने अंघोळ करण्याचा प्रयत्न केला किंवा पिण्यासाठी शुद्ध पाणी दिले की त्याला नैराश्य यायचे. असाच एका भारतीय व्यक्तीबाबतही दावा केला जात होता.

2009 मध्ये एका भारतीय माणसाला ब्रश करून आंघोळ करून 35 वर्षे झाली आहेत. मात्र, त्यानंतर त्याचे काय झाले हे समोर आलेले नाही. हाजीने तरुणपणात अनेक "अपयशांना" तोंड दिल्यानंतर असे जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो युद्धात वापरले जाणारे हेल्मेट घालत असे.

















