२०२६ मध्ये १९१४ ची पुनरावृत्ती! कॅलेंडर जुळले, आता तिसऱ्या महायुद्धाची भीती? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 06:45 IST2026-03-03T05:31:27+5:302026-03-03T06:45:07+5:30

World War 3 predictions 2026, Calendar repetition science : १९१४ आणि २०२६ चे कॅलेंडर तंतोतंत सारखे आहे. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते, त्यामुळे आता २०२६ मध्ये तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. वाचा काय आहे यामागील सत्य.

इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो असे म्हटले जाते, पण २०२६ सालाबाबत हे विधान गणितीदृष्ट्या खरे ठरताना दिसत आहे. सन १९१४ चे कॅलेंडर आणि २०२६ चे कॅलेंडर तंतोतंत सारखे आहे.

योगायोग असा की, १९१४ मध्येच पहिले महायुद्ध सुरू झाले होते. आता मध्य-पूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हे 'कॅलेंडर कनेक्शन' तिसऱ्या महायुद्धाचे संकेत तर नाही ना? अशी भीती नेटकरी व्यक्त करत आहेत.

दिवस आणि वार: १ जानेवारी १९१४ रोजी गुरुवार होता आणि १ जानेवारी २०२६ रोजीही गुरुवारच होता. तसेच ३१ डिसेंबर १९१४ आणि ३१ डिसेंबर २०२६ हे दोन्ही दिवस गुरुवारच असणार आहेत.

कॅलेंडर विज्ञानानुसार, सामान्य वर्षाचे कॅलेंडर दर ११, ११ आणि ६ वर्षांच्या अंतराने पुन्हा तेच येते. १९१४ नंतर १९२५, १९३१, १९४२ आणि आता २०२६ मध्ये हेच कॅलेंडर पुन्हा आले आहे.

१९१४ मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राजपुत्राच्या हत्येनंतर पहिले महायुद्ध भडकले होते. सध्या २०२६ मध्येही जग एका नाजूक वळणावर आहे, कारण इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू आणि त्यानंतर अमेरिकेने केलेले हल्ले यामुळे तणाव टोकाला पोहोचला आहे.

यामुळे इराणने १५ हून अधिक देशांवर हल्ले सुरु केले आहेत आणि जगासाठी महत्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने आर्थिक युद्धाची ठिणगी पडली आहे.

या युद्धामुळे रशिया, चीन आणि उत्तर कोरिया एका बाजूला, तर अमेरिका आणि नाटो देश दुसऱ्या बाजूला, अशी विभागणी होताना दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, कॅलेंडर रिपिट होणे ही एक खगोलशास्त्रीय आणि गणिती प्रक्रिया आहे. याचा युद्धाशी थेट संबंध जोडणे ही केवळ एक योगायोग किंवा सोशल मीडियावरील अफवा असू शकते. मात्र, जागतिक राजकारणातील सद्यस्थिती पाहता हा 'योगायोग' अनेकांना अस्वस्थ करणारा ठरत आहे.