Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:31 IST2025-06-19T12:27:11+5:302025-06-19T12:31:19+5:30

Ayatollah Khomeini News: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांची हत्या केली, तरच युद्ध संपेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, खामेनी कुठे आहेत, हे माहिती आहे, पण आताच मारणार नाही. हे दोन्ही नेते असे का बोलू लागले आहेत?

'अमेरिका हा मोठा राक्षस आहे, तर इस्रायल कॅन्सरची गाठ.' हे विधान आहे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांचे. अमेरिका आणि इस्रायलबद्दल त्यांचे इतके टोकाचे विचार का आहेत, तर दोन्ही देश त्यांच्या जीवारच उठले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना हा संघर्ष थांबवण्याचा एकच पर्याय दिसतोय, तो म्हणजे अयातुल्लाह खामेनींची हत्या. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भाषा अशीच आहे. ते म्हणताहेत की, आम्हाला खामेनींचा ठिकाणा माहिती आहे, पण आम्ही त्यांना आताच मारणार नाही.

त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की, अमेरिका आणि इस्रायलला अयातुल्लाह खामेनी नकोसे का झाले आहेत? याचं कारण आहे खामेनींचं इराणवर असलेलं वर्चस्व, एक हाती सत्ता!

हो. अयातुल्लाह खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. इराणमधील सर्वच निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत. म्हणजे देशातील धोरणांसह परदेशातील धोरणांबद्दलही. त्यामुळे इराणमधील अणुऊर्जा कार्यक्रमही खामेनींच्या निर्णयाचाच भाग आहे.

इस्रायलचे असं म्हणणं आहे की, अण्वस्त्र निर्मिती आणि आयआरजीसी (इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स) अर्थात इराणचे लष्कर. या दोन्ही गोष्टी संपवायच्या असतील, तर खामेनीची हत्या गरजेची आहे. त्यामुळे तिथे सत्ता परिवर्तन होईल.

अयातुल्लाह खामेनी इस्रायला देश म्हणून स्वीकारत नाहीत. ते कट्टर पॅलेस्टाईन समर्थक आहेत. खामेनींनीच इस्रायलविरोधात हिजबुल्लाह, हुथी आणि हमास सारख्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून छुपे युद्ध छेडलेले आहेत.

दुसरीकडे खामेनींनी अणुऊर्जा कार्यक्रमाची गती कमी केली आहे, पण ते थांबवलेला नाही. त्यामाध्यमातून खामेनी इस्रायल, अमेरिकेसह इतर पश्चिमी देशावर दबाव निर्माण करत आहेत. इराणमधील अणुऊर्जा कार्यक्रम इस्रायलला स्वतः प्रचंड धोक्याचा वाटत आलेला आहे.

इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला अमेरिकेचाही विरोध आहे. ट्रम्प सातत्याने त्यासाठी आग्रह करताना दिसत आहेत. पण, देशाची सगळीच सूत्रे हातात असल्याने खामेनी या दोन्ही देशांना जुमानत नाहीयेत.

खामेनी संपले, तर इराणमध्ये सत्तांतर होईल आणि निवडणुका होतील. त्यामुळे नेतृत्व बदलले जाईल. पण, खामेनी संपल्यावरही ते तितकं सोपं असल्याचं दिसत नाहीये. त्याचं कारण म्हणजे खामेनींनी आपला उत्तराधिकारी निवडल्याचे म्हटले जात आहे.

अनेक माध्यमांच्या रिपोर्टसमध्ये असे म्हटले गेले आहे की, खामेनींनी त्याचा दुसरा मुलगा मुजतबा खामेनीला उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. इराणच्या संसदेनेही एका गोपनीय बैठकीत याला मंजुरी दिली आहे. दुसरीकडे खामेनी संपले, तर इराणचे पूर्वीच्या शाहाचा मुलगा रजा पहलवी सत्तेवर दावा करू शकतात. ते सध्या अमेरिकेत आहेत. इस्रायलकडून केल्या जात असलेल्या हल्ल्यांना त्यांचं समर्थन आहे.