पंतप्रधान दुसऱ्या देशांच्या नेत्यांशी हॉटलाइनवरुन संवाद साधतात...हे 'हॉटलाइन' नेमकं काय आहे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:30 PM2021-07-27T15:30:48+5:302021-07-27T15:39:11+5:30

हॉटलाइन हा शब्द तुम्ही दोन देशांचे प्रमुख नेते एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आल्यानंतर ऐकला असेल. पण हॉटलाइन ही यंत्रणा नेमकी काय असते? कशी कार्य करते? जाणून घ्या...

देशातील काही महत्वाच्या प्रसंगी किंवा प्रश्नांवर जेव्हा इतर देशांच्या नेतृत्वाशी चर्चा करण्याची गरज भासते तेव्हा पंतप्रधान 'हॉटलाइन'चा वापर करतात. इतर कॅम्युनिकेशन लाइन्सपेक्षा हॉटलाइनमध्ये नेमका फरक काय आहे हे आपण जाणून घेऊ...

हॉटलाइन यंत्रणेत पॉइंट-टू-पॉइंट कम्युनिकेशन सेवा दिली जाते. ज्यात कॉल आपोआप आधीच डायरेक्टेड नंबरवर लावला जातो. युझरला यात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. यासाठी एक फोन पूर्णपणे फक्त एकाच सेवेसाठी समर्पित केलेला असतो.

हॉटलाइनच्या फोनला कोणत्याही पद्धतीची डायल सुविधा किंवा की-पॅड दिलेला नसतो. हॉटलाइनमध्ये ऑटोमॅटिक सिग्निलिंग, रिंगडाऊन किंवा ऑफ-हुक सेवेच्या नावानंही ओळखली जाते. हॉटलाइनवर नंबर डायल करण्याची गरज भासत नाही. म्हणजेच फोनचा रिसिव्हिर तुम्ही उचलला की थेट समोरच्या व्यक्तीच्या फोनशी तुम्ही जोडले जाता.

जगात काही नेमक्याच देशांमध्ये हॉटलाइन सेवा सध्या सुरू आहे. यात संबंधित देशांच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांना एकमेकांशी संवाद साधता येतो.

भारत-अमेरिका, भारत- पाकिस्तान, चीन-भारत, अमेरिका-रशिया, अमेरिका- ब्रिटन, रशिया-चीन, रशिया-फ्रान्स, रशिया- ब्रिटन, अमेरिका-चीन, चीन-जापान, दक्षिण कोरिआ-उत्तर कोरिआ या हॉटलाइन सध्या उपलब्ध आहेत.

भारत आणि पाकिस्तानमधील हॉटलाइनचा वारंवार उल्लेख केला जातो. या हॉटलाइनची सुरुवात १९७१ सालच्या युद्धानंतर तातडीनं करण्यात आली होती. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि नवी दिल्ली स्थित पंतप्रधान सचिवालय ही दोन ठिकाणं हॉटलाइननं जोडली गेलेली आहेत.

भारत-पाकिस्तानमधील हॉटलाइनचा पहिला वापर १९९१ साली करण्यात आला होता. दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्याच्या उद्देशानं त्यावेळी हॉटलाइनवर चर्चा झाली होती. तर १९९७ साली दुसऱ्यांदा याचा वापर करण्यात आला. त्यावेळी व्यापारासंबंधीची माहिती देण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता.

हॉटलाइन सेवा कम्युनिकेशन क्षेत्रातील सर्वात सुरक्षित पद्धत म्हणून ओळखली जाते. भारत आणि अमेरिकेतील हॉटलाइन सेवेला २०१५ साली सुरू झाली होती. यात दोन्ही देशांचे नेतृत्व एकमेकांशी कोणत्याही अडथळ्याविना थेट संवाद साधू शकतात.