UAE पासून इस्रायलपर्यंत...! इराणच्या क्षेपणास्त्रे अन् ड्रोन हल्ल्याने 'या' ९ देशात हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:32 IST2026-03-02T12:26:44+5:302026-03-02T12:32:01+5:30

शनिवारी सकाळी अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे इराणने आखाती देशांना टार्गेट केले आहे. इराणने अमेरिकन सैन्य तळांना निशाणा बनवले. इराण सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत असल्याने मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. त्यात आतापर्यंत ९ देशांना इराणच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे.

UAE- आतापर्यंत इराणने १६५ बॅलेस्टिक, २ क्रूझ मिसाईल आणि ५४१ ड्रोन हल्ले यूएईवर करण्यात आले आहेत. या हल्ल्यात रहिवासी इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले. ३ मृत्यू तर ७ जखमी झाले आहेत. इस्रायल दूतावास असणाऱ्या परिसरालाही टार्गेट केले गेले. त्यात एका महिलेला आणि तिच्या मुलाला किरकोळ जखम झाली. ड्रोनच्या मलब्यामुळे २ घरांचे नुकसान झाले आहे. लक्झरी बुर्ज हॉटेल अल येथे आग लागली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ लोक जखमी झाले अशी माहिती यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

ओमान - इराणने रविवारी ओमानच्या दुक्कम बंदरावरही टार्गेट केले. ज्यात एक परदेशी व्यक्ती जखमी झाला. या बंदराचा वापर अमेरिकन नौदलाकडून लॉजिस्टिक हब म्हणून केला जातो. स्ट्रेट ऑफ होरमज इथल्या आसपास ३ व्यावसायिक जहाजांवरही हल्ला झाला. यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरच्या एका जहाजाला आग लागली. त्यात ४ जण जखमी झाले आहेत.

कतार - इराणने कतारमध्येही हल्ला केला आहे. त्यात कमीत कमी १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. कतारमध्ये असणाऱ्या अमेरिकन एअरबेसला इराणने टार्गेट केले. त्यात १८ बॅलेस्टिक मिसाईल रोखण्यात यश आले आहे.

बहरीन - इराणच्या एका क्षेपणास्त्राने अमेरिकन नौदलाच्या ५ व्या ताफ्याच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. ज्यामुळे मनामा आणि मुहर्रक शहरांमधील तीन इमारतींचे नुकसान झाले. ४५ क्षेपणास्त्रे आणि नऊ ड्रोन रोखण्यात आले. क्राउन प्लाझा हॉटेलचेही नुकसान झाले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती बहरीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

कुवेत - इराणने ९७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २८३ ड्रोन कुवेतमध्ये डागले आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झालेत. काही भागात रोखण्यात आलेल्या ड्रोनचा मलबा पडल्यामुळे मर्यादित नुकसान झाले. ड्रोनने मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाला टार्गेट केले होते. ज्यामध्ये नऊ कर्मचारी जखमी झाले असं कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली.

सौदी अरेबिया - रियाद आणि पूर्वेकडील भागात इराणी हल्ले यशस्वीरित्या रोखण्यात आले अशी माहिती सौदी परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली. क्षेपणास्त्रे रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रिन्स सुलतान हवाई तळावर लक्ष्य करण्यात आली होती.

जॉर्डन आणि इराक - जॉर्डनने इराणचे ४९ ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखली. इराकमध्ये एका इराणी ड्रोनने आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडला, ज्यामध्ये अमेरिकन लष्करी तळ देखील आहे. दियाला प्रांतात इराण समर्थित मिलिशियाचे चार सदस्य मारले गेले.

इस्रायल - बीट शेमेश शहरात इराणी हल्ल्यानंतर इमारती कोसळल्याने किमान नऊ जण मृत्युमुखी पडले आणि २८ जण जखमी झाले. इस्रायली आपत्कालीन सेवा अजूनही ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

सीरिया - दक्षिण सीरियातील अस स्वेदा शहरावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात चार जण मारले गेले आणि काही जण जखमी झाले. या हल्ल्याचा आणि त्यानंतरच्या प्रतिहल्ल्यांच्या मालिकेचा आखाती प्रदेश आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये नागरी, लष्करी ठिकाणांवर गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे सुरक्षा आणि राजकीय तणाव वाढला आहे.

















