Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:17 IST2025-12-04T13:19:09+5:302025-12-04T14:17:09+5:30

Vladimir Putin India Visit : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आज म्हणजेच गुरुवारपासून दोन दिवसांच्या ( ४ व ५ डिसेंबर) भारत दौऱ्यावर येत आहेत. ऊर्जा, संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापार या महत्त्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन वय सध्या ७३ वर्षे आहे. एवढ्या वयातही ते फिट आहेत. २०१५ मध्ये, त्यांचे रशियन पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्यासोबत व्यायाम करतानाचे फोटो समोर आले होते. त्यावेळी त्यांच्या वर्कआऊट आऊटफिटची किंमत ३,२०० डॉलर होती.

न्यूजवीकचे बेन जुडाह यांनी २०१४ मध्ये ‘Fragile Empire: How Russia Fell in and Out of Love with Vladimir Putin’ या त्यांच्या पुस्तकात पुतिन यांच्याबद्दल लिहिले आहे. पुतिन यांच्यावर लिहिण्यासाठी बेन यांनी तब्बल तीन वर्षे संशोधन केले होते.

पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, पुतिन सकाळी उशिरा उठतात आणि दुपारच्या सुमारास नाश्ता करतात. ते सहसा मोठं ऑम्लेट किंवा दलियाचा मोठा बाऊल खातात. त्यासोबत काही बटेरची अंडी आणि फळांचा रस घेतात. न्यूजवीकच्या अहवालानुसार, ही सर्व खाद्यसामग्री रशियाचे धार्मिक नेते पॅट्रिआर्क किरिल यांच्या शेतीतून नियमितपणे पाठवली जाते. हे खाऊन संपल्यानंतर पुतिन कॉफी पितात.

नाष्ट्यानंतर पुतिन यांच्या व्यायामाचा वेळ सुरू होतो. पुतिन जवळपास दोन तास पोहतात. जुडाह लिहितात, जेव्हा ते पाण्यात असतात, तेव्हा पुतिन बहुतेक वेळा रशियाबद्दल अधिक विचार करत असतात. पोहून झाल्यानंतर पुतिन जिममध्ये वेटलिफ्टिंग करतात. पुतिन कपड्यांच्या बाबतीत खूप पारंपरिक आहेत आणि ते कस्टम-मेड सूट आणि साध्या व्हॅलेंटिनो टाय घालणं पसंत करतात. शासकीय वेबसाइट ‘रशिया बियॉन्ड द हेडलाइन्स’च्या अहवालानुसार, पुतिन यांचे आवडते कपड्यांचे ब्रँड किटोन आणि ब्रियोनी आहेत.

पुतिन ऑफिसमध्ये दुपारनंतर पोहोचतात. सुरुवातीला ते आपल्या टेबलावर बसून ब्रिफिंग नोट्स वाचतात. यामध्ये देशांतर्गत गुप्तचर विभागाच्या आणि परराष्ट्र विषयक अहवालांसोबतच रशियन प्रसारमाध्यमे व आंतरराष्ट्रीय मीडियातील क्लिप्सही असतात कामाशिवाय पुतिन फारसे वाचन करत नाहीत.

न्यूजवीकच्या अहवालानुसार, कामाच्या वेळी पुतिन बहुतेक वेळा तंत्रज्ञानापासून दूर राहतात आणि संगणकाऐवजी कागदी कागदपत्रांनी भरलेला लाल फोल्डर म्हणजेच 'रेड डायरी' तसेच फिक्स्ड-लाइन सोव्हिएत वारेरा टेलिफोन वापरतात. पुतिन यांना सर्व ब्रीफिंगची माहिती लाल फोल्डरमध्ये छापील स्वरूपात दिली जाते. ते इंटरनेटचा वापर कमी प्रमाणात करतात.

जगातील बहुतेक नेत्यांच्या उलट, पुतिन कामाच्या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. ते संगणकाऐवजी लाल फोल्डरमध्ये छापील स्वरूपात मिळणाऱ्या रिपोर्ट्सचा वापर जास्त करतात.

पुतिन हे रात्री उशीरापर्यंत काम करतात. रात्री त्यांच्या बुद्धीची कार्यक्षमता सर्वाधिक तीक्ष्ण असते. परदेश दौर्‍यांदरम्यान पुतिन बिझी असतात. ते जिथेही थांबतात, चादरींपासून ते प्रसाधन सामग्री, अगदी फळांच्या बाऊलपर्यंत सर्व काही बदलले जाते. पुतिन यांचे जेवनही क्रेमलिनकडून तपासले जाते.

पुतिन यांची आवडती डेझर्ट म्हणजे पिस्ता आइस्क्रीम आहे. G-20 शिखर परिषदेदरम्यान त्यांनी चीनच्या शी जिनपिंग यांना ह्याच पिस्ता आइस्क्रीमची भेट दिली होती. पुतिन प्रवास करत असताना त्यांना दूधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ सर्व्ह करता येत नाहीत. ते ज्यावेळी प्रावासात असतात तेव्हा दूधाचे पदार्थ खात नाहीत.

स्वागत समारंभांशिवाय पुतिन दारूपासून दूर राहतात. पुतिन कधी कधी आइस हॉकी खेळतात. पुतिन यांना प्राणी देखील खूप आवडतात. त्यांच्याकडे कोन्नी नावाचा १५ वर्षांचा काळा लॅब्राडोर आहे.