कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 09:00 IST2025-12-17T08:54:57+5:302025-12-17T09:00:14+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला सरकारला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्याशिवाय ट्रम्प यांनी कॅरेबियन समुद्रात अमेरिकेद्वारे निर्बंध घातलेल्या तेल टँकरवर कारवाईस सुरुवात केली आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाच्या तेल टँकरची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर घोषणा करत म्हटलंय की, आमच्या संपत्तीची चोरी, दहशतवाद, ड्रग्ज तस्करी आणि मानव तस्करीसह अनेक कारणामुळे व्हेनेझुएलाच्या सरकारला परदेशी दहशतवादी संघटना घोषित करण्यात येत आहे.

या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने व्हेनेझुएलाला जाणाऱ्या सर्व तेल टँकरची नाकेबंदी करण्याचे आदेश सैन्याला दिले. व्हेनेझुएला पूर्णपणे दक्षिण अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठ्या युद्धनौकांनी घेरले आहे. ही नाकेबंदी आणखी वाढत जाईल. व्हेनेझुएलाला असा झटका बसेल ज्याचा विचारही त्यांनी कधी केला नसेल. जोपर्यंत ते अमेरिकेचे सर्व तेल, जमीन आणि इतर संपत्ती देत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील अशी धमकीच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला दिली आहे.

त्याशिवाय मडुरो सरकार या चोरीचा माल आणि तेल क्षेत्रातून ड्रग्ज दहशतवाद, मानवी तस्करी, हत्या आणि अपहरण यासारख्या गोष्टींना आर्थिक मदत करण्यासाठी करत आहे. बेकायदेशीर प्रवासी आणि गुन्हेगार ज्यांना मडुरो सरकारने कमकुवत आणि असक्षम बायडेन प्रशासन काळात अमेरिकेत पाठवले होते. त्यांनाही व्हेनेझुएलाला परत पाठवले जात आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिका गुन्हेगारांना, दहशतवाद्यांना आणि इतर देशांना आमचा देश लुटण्याची, धमकी देण्याची आणि नुकसान पोहचवण्याची परवानगी देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत शत्रू सरकारला आमचे तेल, जमीन आणि इतर संपत्ती घेण्याचा अधिकार नाही. जे लुटले आहे ते लगेच अमेरिकेला परत द्या असंही ट्रम्प यांनी व्हेनेझुएला बजावले आहे.

अमेरिका अन् व्हेनेझुएला यांच्यात युद्धाचे संकेत - अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि व्हेनेझुएलातील मडुरो यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक हल्ले सुरू आहेत. अलीकडेच अमेरिकेने व्हेनेझुएलाचा एक तेल टँकर जप्त केला होता. व्हेनेझुएलाने अमेरिकेच्या या कारवाईवर लुटीचा आरोप केला होता.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निकोलस मडुरो सरकारवर ड्रग्ज तस्करीचा आरोप केला आहे. व्हेनेझुएलाला इशारा देत अमेरिकेने कॅरेबियन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले. ज्यात जगातील सर्वात मोठी विमानवाहक युद्धनौका आणि हजारो सैनिकांचा समावेश आहे.

अमेरिकेने कथित ड्रग्जच्या बोटींवर हल्लेही केले आहेत. ज्यात शेकडो मृत्यू झाले. १० डिसेंबरला व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर एक टेल टँकर जप्त केला ज्याला मडुरो सरकारने समुद्री दरोडेखोर म्हणून अमेरिकेवर आरोप केले. त्यानंतर ट्रम्प चांगलेच संतापले.

मडुरो यांच्या टीकेनंतर ट्रम्प यांनी नव्याने निर्बंध लादले. ज्यात मडुरो कुटुंब आणि तेल निर्यातीशी निगडीत कंपन्यांना फटका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला इथं असणाऱ्या मडुरो यांना सत्ता सोडण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. मात्र मडुरो यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएल सरकारला धमकी दिली होती. त्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मडुरो यांना फोन करत व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकांच्या एकजुटीचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे जर अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला तर जगातील दोन महासत्तांमध्ये संभाव्य संघर्ष निर्माण होण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

















