७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 15:03 IST2025-08-15T14:59:36+5:302025-08-15T15:03:43+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन १५ ऑगस्ट रोजी 'अलास्का'मध्ये भेटणार आहेत. ७ वर्षांनंतर दोन्ही नेत्यांमधील या बैठकीचा मुख्य अजेंडा रशिया-युक्रेन युद्ध थांबवणे हा आहे. अलास्कातील सर्वात मोठे शहर अँकोरेज येथील एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन लष्करी तळावर ट्रम्प आणि पुतिन यांची वन टू वन भेट होईल. त्यांच्यामध्ये फक्त एकच ट्रांसलेटर असेल.
या दोघांमध्ये काय चर्चा होईल याचा तपशील देण्यात आलेला नाही. बैठकीनंतर दोन्ही नेते पत्रकार परिषद घेतील.५४ वर्षांपूर्वी १९७१ मध्ये या लष्करी तळावर राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि जपानचे राजा हिरोहितो यांची ऐतिहासिक भेट झाली होती. पुतिन अलास्कामध्ये येण्यापूर्वीच त्यांचं आर्मर्ड लिमोझिन ऑरस सेनाट रशियन कार्गो विमानाने बेसवर पोहोचली आहे. बैठकीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या आणि कप देखील पुतिन यांच्या टीमने सील केल्या आहेत.
अलास्कापासून ८८ किमी अंतरावर असलेल्या अनादिरमध्ये रशियन लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. पुतिन यांच्यासोबत त्यांची एफएसओ (फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस) युनिट असेल. ही एजन्सी पुतिन यांना प्रत्येक परदेश दौऱ्यात सुरक्षित ठेवते. आइस फोर्ट्रेस नावाच्या या लष्करी तळावर ३२ हजार अमेरिकन सैनिक आधीच तैनात आहेत.
ट्रम्पच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, कीहोल (केएच-११) रिकॉन उपग्रह देखील सक्रिय असतील. त्याच वेळी सायबर सुरक्षेसाठी बेसचे संपूर्ण नेटवर्क एअर-गॅप्ड म्हणजेच इंटरनेट सेवा पूर्णपणे कापली जाईल. ३०० किमीच्या परिसरात संपूर्ण परिसरात नो-फ्लाय झोन लागू असेल. बेसच्या आत आणि बाहेर दोन लेअरची सुरक्षा असेल. पहिले सैन्य पोलिस आणि नॅशनल गार्ड असेल, दुसरे विशेष दल आणि गुप्त सेवांचे अधिकारी असतील. ट्रम्प यांचे एअर फोर्स वन विमान उतरताच पूर्णवेळ मिलिट्री गार्ड राहील.
२०२२ पासून रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठक होत आहे. ट्रम्प यांनी २०२३-२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक वेळा आश्वासन दिले होते की ते अध्यक्ष झाल्यानंतर २४ तासांच्या आत रशिया-युक्रेन युद्ध संपवतील. अध्यक्ष होऊन ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु ट्रम्प यांचे वचन अद्याप पूर्ण झालेले नाही.
उलट, रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले वाढवले. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्पने रशियाला शांतता करारावर चर्चा करण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली. जर तात्काळ युद्धबंदीवर सहमती झाली नाही तर अमेरिकेने अधिक कठोर निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्पने दिला होता. ही अंतिम मुदत ८ ऑगस्ट रोजी संपली. अंतिम मुदतीच्या दोन दिवस आधी ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली होती
या बैठकीनंतरच ट्रम्प आणि पुतिन यांच्यात बैठकीचे नियोजन करण्यात आले. ट्रम्प यांनी ८ ऑगस्ट रोजी बैठकीची घोषणा केली. सध्या या बैठकीनंतर युद्धबंदी अपेक्षित नाही. युक्रेन युद्ध संपवण्याचे मार्ग काय असू शकतात हे समजून घेणे हा या बैठकीचा उद्देश असल्याचे सांगत व्हाईट हाऊसने तात्काळ युद्धबंदीची शक्यताही फेटाळून लावली.
ट्रम्प आणि पुतिन यांना अलास्कामध्ये भेटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षा. अलास्काच्या मुख्य भूमीचा सर्वात जवळचा भाग रशियातील चुकोटका येथून फक्त ९० किलोमीटर अंतरावर आहे. पुतिन कोणत्याही 'शत्रू' देशावरून उड्डाण न करता तेथे पोहोचू शकतात. या भागात काही रशियन हवाई दलाचे तळ आणि लष्करी देखरेख केंद्रे आहेत जिथे अण्वस्त्रे देखील असू शकतात. पुतिन यांना येथे भेटणे अधिक सुरक्षित आहे.
अलास्का येथील भेटीचं दुसरे कारण म्हणजे अंतर. अलास्का युक्रेन आणि युरोपपासून खूप दूर आहे. हे पुतिन यांच्या विचारानुसार आहे. ज्यामध्ये ते कीव आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांना मध्यस्थी न करता अमेरिकेशी थेट बोलू इच्छितात. ही बैठक ट्रम्प यांच्या पुढाकाराने होत आहे. त्यामुळे अमेरिका अलास्का येथे पुतिन यांच्या सुरक्षेत जोखीम घेणार नाहीत असं भारताचे निवृत्त एडमिरल गिरीश कुमार गर्ग यांनी सांगितले.
अमेरिकेच्या भूमीवर बैठकीला सहमती देण्यापूर्वी रशियाने पुतिन यांच्या सुरक्षेची हमी घेतली असावी. अलास्कामध्ये अमेरिकेच्या सापळ्यात अडकण्याइतके पुतिन मूर्ख नाहीत. युरोपियन युनियन किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी जाण्याऐवजी अमेरिकेत जाण्याची पुतिन यांची तयारी हे अमेरिकेशी असलेले त्यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून देखील पाहिले जाऊ शकते. ट्रम्प यांनी १३ ऑगस्ट रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी कब्जा असणारे भाग सोडण्याबाबत चर्चा केली. झेलेन्स्की यांनी कोणत्याही अटीशिवाय युद्धबंदीची मागणी केली आहे तर युक्रेनशी शांतता चर्चा तेव्हाच होऊ शकते जेव्हा युक्रेन रशियाने व्यापलेल्या भागांवरील आपला दावा सोडून देईल आणि त्या भागांना रशियाचा भाग म्हणून स्वीकारेल असं पुतिन यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.