CoronaVirus: भारतानं दिलेलं 'ते' औषध ठरलं निरुपयोगी?; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:18 PM2020-04-30T15:18:44+5:302020-04-30T15:27:35+5:30

जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून ३२ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत सव्वा दोन लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

युरोपियन देशांनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अमेरिकेत १० लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून ६१ हजार जणांना जीव गमवावा लागला आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे दररोज दीड ते दोन हजार जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे महासत्ता असलेली अमेरिकादेखील कोरोनापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

कोरोनावरील उपचारांचा भाग म्हणून अमेरिकेनं भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनची मागणी केली. भारतानं हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनच्या निर्यातीवर निर्बंध घातल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट धमकीच दिली होती.

यानंतर भारतानं हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनची निर्यात सुरू केली. मात्र हे औषध कोरोनावरील उपचारांदरम्यान फारसं परिणामकारक ठरत नसल्याचं अमेरिकेतल्या अनेक डॉक्टरांनी सांगितलं.

हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनमुळे फारसा फरक पडत नसल्यानं आता अमेरिका महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकन सरकार इबोलावरील औषधाच्या (रेमडेसिव्हिर) वापराला परवानगी देण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाबाधितांवर घेण्यात आलेल्या चाचणीत इबोलावरील औषध परिणामकारक ठरल्याची माहिती ऑक्सफर्डमधील अभ्यासकांनी दिली.

कॅलिफॉर्नियास्थित जिलाद सायन्सेसनं रेमडेसिव्हिर औषधाची निर्मिती केली असून ते अँटी व्हायरल प्रकारात मोडतं. जगभरात या औषधाची चाचणी झाली असून १ हजारपेक्षा अधिक रुग्णांवर ते प्रभावी ठरलं आहे.

रेमडेसिव्हिर शरीरातील कोरोना विषाणूला रोखू शकतं, अशी माहिती कालच व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेतले प्रतिष्ठित संसर्ग रोग तज्ज्ञ अँथॉनी फॉसी यांनी दिली.

चाचण्यांमध्ये रेमडेसिव्हिर उपयोगी असल्याचं दिसलं असून त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास ऑक्सफर्डमध्ये वाढत्या संसर्गजन्य आजाराशी संबंधित विषयाचे प्राध्यापक पीटर हॉर्बी यांनी व्यक्त केला. हॉर्बी आजारांच्या धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या नेर्व्हटॅग समितीचे प्रमुखदेखील आहेत.