इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:04 IST2025-06-22T12:02:08+5:302025-06-22T12:04:29+5:30
US Attack On Iran Nuclear Site: इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान रात्री अमेरिकेने इराणमधील तीन अणुकेंद्रांवर तुफानी हल्ला चढवला. या हल्ल्यात ही तिन्ही अणुकेंद्रं नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. हा हल्ला करण्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक बी२ बॉम्बर्स विमानांचा वापर केला. या विमानांनी प्रचंड विध्वंसक क्षमता असलेले बंकर बस्टर बॉम्ब इराणच्या अणुकेंद्रांवर टाकले. या बॉम्बची काही खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.…

इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान रात्री अमेरिकेने इराणमधील तीन अणुकेंद्रांवर तुफानी हल्ला चढवला. या हल्ल्यात ही तिन्ही अणुकेंद्रं नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. हा हल्ला करण्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक बी२ बॉम्बर्स विमानांचा वापर केला. या विमानांनी प्रचंड विध्वंसक क्षमता असलेले बंकर बस्टर बॉम्ब इराणच्या अणुकेंद्रांवर टाकले. या बॉम्बची काही खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.…
या बॉम्बला मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर (MOP) असंही म्हटलं जातं. एमओपी हा एक ३० हजार पौंड वजनाचा बॉम्ब आहे. हा बॉम्ब खासकरून भूमिगत ठिकाणांना नष्ट करण्यासाठी बनवण्यात आला आहे. हा बॉम्ब अगदी मजबूत अशा स्टिलच्या आवरणाने बनवण्यात आला आहे. हा बॉम्ब जमिनीखाली शेकडो फूट आतपर्यंत घुसू शकतो. त्यानंतर जमिनीखाली त्याचा स्फोट होतो. त्यामुळे आता असलेल्या सर्व वस्तू नष्ट होतात.
अमेरिकेच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब जीपीएस गाईडेड आहे. तसेच तो केवळ बी-२ स्पिरीट स्टिल्थ बॉम्बरद्वारेच टाकता येतो. बी२ बॉम्बर्सचं वैशिष्ट्य म्हणजे हे विमान रडारला हुलकावणी देऊन लांब पल्ला गाठू शकतं तसेच हवेमध्येच इंधन भरून लक्ष्या पर्यंत पोहोचू शकते.
आतापर्यंत हा बॉम्ब कुठल्या युद्धात वापरण्यात आल्याची जाहीर अधिकृत माहिती नव्हती. मात्र लष्करी तज्ज्ञांच्या मते हा बॉम्ब आता अधिक अत्याधुनिक आणि प्रभावी झाला आहे. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते हा बॉम्ब सुमारे २०० फूट खोलीपर्यंत घुसू शकतो.
दरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलाकडे सध्या १९ बी२ बॉम्बर विमानं आहेत. ही विमाने सबसॉनिक वेगाने उड्डाण करतात. १९९०च्या दशकात कोसोवोमध्ये झालेल्या युद्धात बी२ घ्या वैमानिकांनी मिसूरी येथील हवाई तळावरून उड्डाण करून लक्ष्य उद्ध्वस्त केलं होतं. तर २०१७ मध्ये दोन बी२ बॉम्बर्सनी ३४ तासांचं उड्डाण करून लिबियामधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर हल्ला केला होता.
दुसरीकडे मागच्या काही काळात इस्राईलने गाझा, लेबेनॉन आणि इराणमध्ये हवाई हल्ले करताना अमेरिकन बॉम्ब वापरले आहेत. मात्र इस्राईलकडची विमाने एवढे अवजड बॉम्ब वाहून नेण्यासाठी सक्षम नाही आहेत.