"दाऊदनं दुसरा निकाह केला अन् ती..."; भाच्यानं केला धक्कादायक खुलासा, चौकशीत दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:06 PM2023-01-17T13:06:26+5:302023-01-17T13:13:04+5:30

फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा झाला आहे. दहशतवादी नेटवर्क प्रकरणात एनआयएने सुरक्षा एजन्सी दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाहचा जबाब नोंदवला आहे. अलीशाहने आपल्या जबाबात दाऊदबद्दल अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसरा निकाह केला अशी माहिती अलीशाहने दिली आहे. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन पाकिस्तानातील पठाण महिलेशी दुसरा निकाह केला आहे. मात्र, त्यानं निकाह केलेल्या महिलेचं नाव उघड केलेलं नाही.

दाऊदने डी कंपनी चालवण्यासाठी स्वतःचे नेटवर्क तयार केले असून सांकेतिक भाषा आणि सहजासहजी उलगडता येणार नाही, अशा कोडवर्डचा वापर करून तो व्हॉइस मेसेज पाठवत असल्याची माहिती देखील एनआयएनं मिळवली आहे.

अलीशाह इब्राहिम हा दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिचा मुलगा आहे. दाऊदचा भाचा अलीशाहने एनआयएच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, डॉन दाऊद पाकिस्तानमधील कराचीच्या डिफेन्स एरियामध्ये लपला असून त्यानं दुसरं लग्न केलं आहे.

एनआयएने दाऊद इब्राहिम आणि डी कंपनी प्रकरणी मुंबईत मोठी कारवाई केली होती. यामध्ये अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले. एनआयएच्या चौकशीदरम्यान अलीशाह इब्राहिम पारकरचा जबाब या प्रकरणाशी जोडण्यात आला आहे.

दाऊद इब्राहिमची ही दुसरी पत्नी पाकिस्तानातीलच पठाण कुटुंबातील आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, दाऊद इब्राहिम हेच सांगत होता की त्याने पहिली पत्नी महजबीन हिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले आहे, परंतु अलीशाच्या म्हणण्यानुसार तसे अजिबात नाही.

NIA ला दिलेल्या जबाबात अलीशाह म्हणाला की, “मी जुलै २०२२ मध्ये दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी महजबीन हिला दुबईत भेटलो. तेव्हाच मला दाऊद इब्राहिमच्या दुसऱ्या निकाहची माहिती मिळाली". अलीशाहच्या म्हणण्यानुसार दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी महजबीन ही प्रत्येक सण आणि प्रत्येक प्रसंगी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे भारतात बसलेल्या नातेवाईकांशी संपर्कात आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईडीने अलीशाचीही चौकशी केली होती. त्यावेळी अलीशाहने सांगितले होते की, "मला अनेक लोकांकडून समजले आहे की, दाऊद इब्राहिम आणि पत्नी मेहजबीन यांना पाच मुले आहेत आणि सर्व पाकिस्तानात राहतात."

दाऊद सध्या कराचीत अब्दुला गाजीबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रहीम फाकी परिसरात असलेल्या संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे.

दाऊद सध्या कोणाच्याही थेट संपर्कात नसला तरी आपली गँग चालवण्यासाठी त्यानं स्वतंत्र नेटवर्क उभारले आहे. त्यातून त्याच्या कंपनीतील लोकांना त्याचा मेसेज बरोबर पोहोचवला जातो, अशी माहिती छोटा शकीलचा मेव्हणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांच्या चौकशीतून उघड झाली आहे.

हवालामार्फत केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठीही याच पद्धतीने सांकेतिक लिपीतील मेसेजचा वापर केला जातो. त्याचे मेसेज पाठवण्याचा आणि निरोप मिळवण्याचा क्रमही याच पद्धतीने असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे.