सलाम! रुग्णसेवेची शपथ त्यांनी शेवटपर्यंत पाळली; उपचार करता करता दोन नर्सेसचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 21:23 IST2020-04-03T21:09:37+5:302020-04-03T21:23:38+5:30

कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. चीननंतर युरोपमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला.
सध्या युरोपमधील परिस्थिती आधीच्या तुलनेत फारशी गंभीर वाटत नसली, तरीही ती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.
इटली, स्पेन, ब्रिटनसारख्या देशांच्या आरोग्य यंत्रणा कोरोनापुढे मोडकळीस आली. ब्रिटनमध्ये कोरोनाचे ३८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत साडे तीन हजार जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
परिस्थिती अतिशय बिकट असून, कामाचा अतिरिक्त ताण असूनही ब्रिटनमधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.
रुग्णाच्या सेवेसाठी वाहून घेतलेल्या ब्रिटनमधील दोन नर्सचा कोरोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला. त्या दोघांनाही प्रत्येकी दोन मुलं आहेत.
केंटमधल्या मार्गेट येथील क्यूईक्यूएममध्ये सेवा देणाऱ्या एमी ऑरॉक यांचा कोरोनानं मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून स्वत:ला कोरोना रुग्णांच्या सेवेत अखंडितपणे झोकून देणाऱ्या एमी यांच्यात दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लक्षणं आढळून आली होती.
वयाच्या ३८ व्या वर्षी एमी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना मॅडी, मॉली आणि मेगन अशा तीन मुली आहेत. आमची आई देवदूत होती. तिच्या डोक्यावर कायम मुकूट (नर्सिंग कॅप) असायचा. तोच मुकूट घालून ती निघून गेली, अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया या मुलींनी दिली.
एमी यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांत ३६ वर्षीय अरीमा नसरीन यांचा मृत्यू झाला.
पश्चिम मिडलँड्समधील वॉलसल मॅनोर रुग्णालयाच्या अतिदक्षता रुग्णालयात अरीमा यांनी अखेरचा श्वास घेतला. दैवदुर्विलास म्हणजे अरीमा याच कक्षात कार्यरत होत्या.
गेल्या १६ वर्षांपासून अरीमा नसरीन वैद्यकीय सेवा देत होत्या. मार्चच्या अखेरीस त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.