CoronaVirus: मृतदेह तंबूत ठेवण्याची वेळ, चीनमध्ये स्मशानभूमीत जागा पुरेना; जपानमध्येही कोरोना झाला बेकाबू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:01 PM2023-01-08T12:01:48+5:302023-01-08T12:09:31+5:30

चीनच्या प्रत्येक शहरातील सुमारे निम्मे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, असा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे.

चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून, स्मशानभूमीत जागा उपलब्ध नसल्याने आता मृतदेह तंबूत ठेवण्यात येत आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षावर नजर ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, चीनपाठोपाठ जपान, ब्रिटन व अमेरिकेसह इतर देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

चीनच्या प्रत्येक शहरातील सुमारे निम्मे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, असा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे. १ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान २५० दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चिनी आरोग्य एजन्सीच्या फुटलेल्या दस्तऐवजातून उघड झाले आहे. एशिया टाईम्सच्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात चीनच्या ४० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे.

जपानमध्येही कोरोना बेकाबू झाला आहे. जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी येथे ४५६ लोकांचा मृत्यू झाला. राजधानी टोकियोमध्येच २०,७२० नवे रुग्ण आढळले असून, ६५० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, गेल्या आठवडाभरात वृद्धाश्रमात राहणाऱ्या १०० लोकांचा मृत्यू झाला असून, ७३८ लोक उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, वृद्धाश्रमातील ५.८ टक्के मृत्यूचे कारण कोरोनाचा संसर्ग आहे.

चीनमधील ट्विटरसारखी सोशल मीडिया साईट वीबोने आपल्या हजाराहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. यात कोविड धोरणावर टीका करणाऱ्या तसेच चीनमधील आरोग्य तज्ज्ञांवर वैयक्तिक टिपण्या करणाऱ्या खात्यांचा समावेश आहे.

निलंबित केली गेली, तर काहींवर कायमची बंदी घालण्यात आली आहे, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे.

१७ देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. यात स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली व दक्षिण कोरिया देशांचा समावेश आहे.