युद्धात अमेरिकेचे तीन F-15E फायटर जेट पडले, किती नुकसान झालं? जाणून धक्का बसेल! इराण नव्हे, स्वतःच्याच यंत्रणेनं केला घात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 20:15 IST2026-03-02T20:06:42+5:302026-03-02T20:15:13+5:30
विशेष म्हणजे, हा अपघात तांत्रिक बिघाडाने नाही तर 'फ्रेंडली फायर'मुळे झाल्याची प्राथमिक माहिती अमेरिकन सेंट्रल कमांडने दिली आहे.

अमेरिका-इस्रायल अणि इराण युद्धात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. १ मार्चच्या रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास, 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' अंतर्गत मोहिमेवर असलेली अमेरिकेची तीन F-15E स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने कुवैतच्या आकाशात दुर्घटनाग्रस्त झाली.

विशेष म्हणजे, हा अपघात तांत्रिक बिघाडाने नाही तर 'फ्रेंडली फायर'मुळे (चुकीने आपल्याच बाजूने झालेला हल्ला) झाल्याची प्राथमिक माहिती अमेरिकन सेंट्रल कमांडने दिली आहे.

स्वतःच्याच यंत्रणेनं घात केला - ही घटना घडली, तेव्हा संपूर्ण परिसरात इराणची विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू होते. या संपूर्ण गोंधळात कुवैती एअर डिफेन्स सिस्टिमने या अमेरिकन विमानांना शत्रूचे विमान समजून चुकून लक्ष्य केले. कुवैतने या घटनेची कबुलीही दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेनेच कुवैतला दिलेली MIM-104 Patriot, NASAMS किंवा Skyguard यांपैकी एखाद्या प्रगत एअर डिफेन्स सिस्टिमनेच अमेरिकन विमानं पडली असण्याची शक्यता आहे.

सुदैवाने, तिन्ही विमानांमधील ६ कर्मचाऱ्यांनी वेळेत इजेक्ट केल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, अमेरिकेच्याच एअर डिफेंस सिस्टिमने त्यांचेच फायटर जेट पाडले.

मोठं नुकसान - F-15 ची किंमत त्याच्या मॉडेलवर आधारीत आहे. जुन्या आवृत्त्यांची किंमत अंदाजे 30-40 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी आहे. तर नवीन F-15EX आवृत्तीची किंमत प्रति विमान अंदाजे 80-90 दशलक्ष दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी आहे.

जर अमेरिकेने तीन लढाऊ विमाने गमावली असतील तर त्यांचे किमान 270 दशलक्ष दशलक्ष अमेरिकन डॉलर ते जास्तीत जास्त 291 दशलक्ष एवढे नुकसान नुकसान झाले असेल.

F-15 हे एक अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे, जे प्रामुख्याने हवाई वर्चस्वासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे प्रथम मॅकडोनेल डग्लसने विकसित केले होते, जे नंतर बोईंगने विकत घेतले अथवा अधिग्रहण केले.

का खास आहे F-15E? हे विमान मॅक २.५ (३००० किमी/तास) वेगाने धावू शकते. प्रगत रडार, आधुनिक एव्हीओनिक्स आणि हवेतून हवेत तसेच जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता यामुळे हे विमान हवाई वर्चस्व गाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.


















