पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:10 IST2025-07-10T08:07:40+5:302025-07-10T08:10:10+5:30

९ जुलै २०२५, म्हणजेच हा दिवस सामान्य दिवसांपेक्षा १.३ ते १.५१ मिलिसेकंद आधी संपला. हा इतिहासातील सर्वात लहान दिवस मानला जाऊ शकतो. यापूर्वी ५ जुलै २०२४ रोजी पृथ्वीने आपले परिभ्रमण १.६६ मिलिसेकंद आधी पूर्ण केले होते.

पृथ्वी २४ तासांत एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करते. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अँड रेफरन्स सिस्टम सर्व्हिस (आयईआरएस) नुसार, २२ जुलै आणि ५ ऑगस्टचे दिवस देखील सामान्य दिवसांपेक्षा १.३ ते १.५१ मिलिसेकंद कमी असू शकतात.

चंद्र पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम करत आहे, तो पृथ्वीला थोडे वेगाने फिरवत आहे. आयईआरएस जागतिक वेळ मापनाचे निरीक्षण करते. ९ व २२ जुलै आणि ५ ऑगस्ट या तीन दिवसांत चंद्र पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात दूर आणि ध्रुवाजवळ असेल. 

५ जुलै २०२४ ला झाला विक्रम - सर्वात जलद परिभ्रमणाचा विक्रम ५ जुलै २०२४ रोजी झाला, जेव्हा पृथ्वीने आपले पूर्ण परिभ्रमण १.६६ मिलिसेकंद आधी पूर्ण केले, म्हणजेच २४ तासांपेक्षा थोड्या कमी वेळेत.

यात कोणताही धोका नसला, तरी याचा परिणाम सध्याच्या वेळ मोजण्याच्या प्रणालीवर (अणु घड्याळ) होऊ शकतो. भविष्यात आपल्याला घड्याळातून १ सेकंद वजा करावा लागू शकतो. याला निगेटिव्ह लीप सेकंद म्हणतात.

परिभ्रमणाचा वेग असमान - पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग नेहमीच सारखा नसतो. सूर्य आणि चंद्राची स्थिती, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, पृथ्वीच्या आत व बाहेरील वस्तुमानाचे असमान वितरण, ज्यामध्ये बर्फ वितळणे, समुद्राच्या पातळीत बदल अशा गोष्टी त्यावर परिणाम करतात.

दिवसाची लांबी- सुरुवातीला पृथ्वी फक्त सहा-आठ तासांत ३६० डिग्री अंशात फिरत असे. त्यानंतर एक दिवस पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वाढत गेला, सध्या तो सुमारे २४ तासांचा आहे. सुरुवातीच्या निर्मितीच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून फक्त २४,००० किमी अंतरावर होता. 

टॅग्स :पृथ्वीEarth