Taliban Government: तालिबानी म्हणतात...'पैशाचा अपव्यय नको, शपथविधी सोहळाच करणार नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 03:07 PM2021-09-11T15:07:27+5:302021-09-11T15:12:15+5:30

Taliban Government: अफगाणिस्तानात तालिबाननं आपल्या ३३ मंत्र्यांची नावं घोषीत केली होती. पण नव्या सरकारचा शपथविधी सोहळा केव्हा होणार याकडे जगाचं लक्ष लागून होतं. तालिबाननं मात्र शपथविधी सोहळाच रद्द केलाय.

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबाननं आपल्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा याआधीच केली आहे. ३३ जणांच्या यादीत अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा समावेश असल्याचं आपण पाहिलं आहे. पण या सरकारचा शपथविधी नेमका केव्हा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.

अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी सरकार नव्या सरकारचा शपथविधी करुन अमेरिकेला इशारा देण्याचा तालिबानचा मानस असल्याचं सांगितलं जात होतं.

पण आज तालिबानी सरकारचा शपथविधी सोहळा होणार नसल्याची माहिती अफगाणिस्तानातील स्थानिक वाहिन्यांनी दिली आहे. इतकंच नव्हे, तर तालिबानी सरकार आपल्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळाच करणार नाहीयत अशी माहिती समोर आली आहे.

शपथविधी सोहळा न करण्यामागचं कारण तालिबान्यांनी पैशाचा अपव्यय कशाला करायचा असं दिलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तालिबानी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तान, चीन, रशियासह एकूण ६ देशांना निमंत्रण पाठविण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली होती. पण अशा शपथविधी सोहळ्यांवरील खर्च म्हणजे देशाच्या संपत्तीचा गैरवापर करणं असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

तालिबानच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शपथविधी सोहळा रद्द करण्यामागे नेमकं पैशाच्या अपव्ययाचं कारण आहे की इतर काही? असा सवाल उपस्थित झाला आहे.

तालिबाननं जारी केलेल्या नव्या सरकारमध्ये बहुतांश आंतरराष्ट्रीय मोस्ट वॉण्डेट दहशतवाद्यांचा समावेश आहे. यात अमेरिकेनं ५० लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलेल्या दहशतवाद्याला तालिबाननं देशाचं गृहमंत्री केलं आहे. तर हक्कानी नेटवर्कच्या प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यालाही मंत्री केलं आहे.

२००८ सालापासून हक्कानी देखील वॉण्टेड लीस्टमध्ये आहे. काबुलमधील बॉम्बस्फोट आणि तत्कालीन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद करजाई यांच्या हत्येच्या योजनेचाही आरोप सिराजुद्दीन हक्कानीवर आहे.

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्ताननं तालिबानकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. तालिबान सरकार अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करेल असा विश्वास पाकिस्ताननं व्यक्त केला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानातील तालीबानी सरकारवरही नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानकडूनही प्रयत्न केले जात आहेत.