अचानक आलेल्या पुरात 33 ठार, बोगदा, दरड कोसळल्या, अनेक वाहने अडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:06 PM2023-07-16T12:06:45+5:302023-07-16T12:16:07+5:30

सलग ६ दिवसांच्या पावसानंतर दक्षिण कोरियात पूर आला आहे. डझनभर शहरे पाण्यात बुडाली आहेत.

दक्षिण कोरियामध्ये अचानक आलेल्या पुरानंतर मोठा विध्वंस झाला आहे. सततच्या मुसळधार पावसाने धरण पाण्याने भरले आहे.

धरणाचे पाणी रस्त्यावर आले, लोकांच्या घरात घुसले. मध्य दक्षिण कोरियामध्ये बोगदा कोसळल्याने डझनभर वाहने अडकली आहेत.

बोगद्याच्या आत अडकलेल्या बसमधून बचाव दलाच्या जवानांनी पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

अनेक दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बोगद्यात अडकलेल्या वाहनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बचावकर्ते करत आहेत. बोगद्यात किती लोक अडकले आहेत हे स्पष्ट झालेले नाही.

चुंगचेंग प्रांतात शुक्रवारी एक स्लो ट्रेन देखील भूस्खलनाचा बळी ठरली. ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता. या दुर्घटनेनंतर सर्व धिम्या गाड्या आणि बुलेट ट्रेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे येथे बुलेट ट्रेन उशिराने धावत आहेत.

९ जुलैपासून देशभरात पावसाची संततधार सुरू आहे. पूर आला आहे. अनेक प्रांत पाण्यात बुडाले आहेत. सात हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे.

भूस्खलनामुळे डझनभर घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रेल्वे स्थानके आणि रस्ते जलमय झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे विजेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. २७ हजारांहून अधिक लोकांना विजेशिवाय जगावे लागत आहे. किमान १३ प्रांत आणि शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. एकट्या मध्य गोसान जिल्ह्यात ६००० लोक रात्रभर वीजविना राहिले.

दक्षिण कोरियात शनिवारी सुमारे ३०० मिमी पाऊस झाला. कोरियन हवामान विभागाने सांगितले की, दरवर्षी १००० मिमी ते १८०० मिमी पाऊस पडतो. सर्वाधिक पाऊस उन्हाळ्यात होतो.

पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता कोरियाच्या हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाच्या परिस्थितीमुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या पंधरवड्यात भारत, चीन आणि जपानसह अनेक देशांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.