CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:15 AM2020-08-12T10:15:08+5:302020-08-12T10:26:25+5:30

First Corona Vaccine Of Russia : संशोधकांनुसार मानवी चाचणीसाठी एखाद्या लसीला अनेक वर्षे लागतात. मात्र, रशियाने मानवी चाचणी दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात केली आहे.

कोरोना महामारीशी अवघे जग लढत असताना रशियाने कोरोना लस तयार केल्याची घोषणा करत त्याची घोषणाही केली आहे. मात्र, रशियाने जेवढ्या वेगाने ही लस तयार केली आहे, त्यावर आता जागतिक तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

ऑक्सफर्ड एस्ट्राझिनेका, मॉडर्ना आणि फायझरसारख्या कोरोना लसीवर काम करणाऱ्या संस्थांच्या वैज्ञानिकांनी रशियाची लस ही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या संशोधकांनुसार मानवी चाचणीसाठी एखाद्या लसीला अनेक वर्षे लागतात. मात्र, रशियाने मानवी चाचणी दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात केली आहे.

युनाय़टेड हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसचे सचिव अॅलेक्स अजर यांनी सांगितले की, लस सुरक्षित असणे सर्वांत महत्वाचे आहे. सर्वात आधी बनिवणे हे महत्वाचे नाही. चाचणीचे आकडे पारदर्शी पद्धतीने जाहीर झाल्यानंतरच त्या लसीची सुरक्षा आणि परिणामांची माहिती मिळणार आहे.

जॉर्जटाउन यूनिव्हर्सिटीचे ग्लोबल पब्लिक हेल्थ लॉ एक्स्पर्ट लॉरेन्स गोस्टिन यांनी सांगितले की, रशियाने शॉर्टकट मारल्याने ही लस परिणामकारक असणार नाही. त्याचसोबत ती सुरक्षितही असणार नाही. तर दुसरीकडे WHO नेही या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारविक यांनी सांगितले की, कोरोना लसीला परवानगी देण्यााधी त्याचा परिणाम आणि सुरक्षेची तपासणी केली जाते. त्यानंतरच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येणार आहे.

रशियाच्या या लसीची चाचणी 18 जूनला केवळ 38 लोकांवरच करण्यात आली होती. पहिले 15 आणि नंतर दुसऱ्या समुहाच्या लोकांना 20 जुलैला डिस्चार्ज देण्यात आला होता.

ही लस लाँच करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सांगितले की, ही लस चांगला परिणाम करणार आहे. इम्युनिटी वाढवेल. ही लस सर्व सुरक्षा मानकांवर खरी उतरली आहे. लवकरच य़ा लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार आहे.

जगभरातूनही या लसीला मागणी नोंदविण्यात आली असून फिलिपाईन्सचे राष्ट्रपतींनी रशियावर विश्वास व्यक्त केला आहे. मी स्वत: लोकांमध्ये जाऊन आधी ही लस टोचून घेणार आहे, असे म्हटले आहे.

तर अमेरिकेने या लसीला विरोध केला असून अमेरिकेच्या एफडीएने लसीबाबत अनेक नियम बनविले आहेत. रशियाची ही लस त्या नियमांच्या आजुबाजुलाही फिरकू शकत नाही, असे व्हाईट हाऊसचे काऊन्सेलर केलाएन कॉन्वे यांनी सांगितले.

Read in English