Russia Ukraine War : ‘रशियावरील निर्बंधांमुळे जग उपासमारीच्या उंबरठ्यावर’; पुतिन म्हणाले, “युरोपलाही भोगावे लागतील परिणाम”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 02:36 PM2022-05-13T14:36:33+5:302022-05-13T14:58:34+5:30

पुतिन म्हणाले की, अनेक देशांना आधीच उपासमारीच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे आणि जर निर्बंध कायम राहीले तर…

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले. परंतु याचा परिणाम त्याच देशांना अधिक झाल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.

पाचात्य देशांनी युक्रेनमधील त्यांच्या कारवाईसाठी लादलेल्या इतिहासातील सर्वात कठोर निर्बंधांमुळे पाश्चात्य देश स्वतः प्रभावित झाले आहेत, असं पुतिन म्हणाले. गेले अनेक दिवस रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यात युक्रेनही मागे हटत नसून ते रशियाचा अगदी कठोरपणे सामना करताना दिसत आहेत.

अनेक देशांना आधीच उपासमारीच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे आणि रशियावर निर्बंध कायम राहिल्यास युरोपियन महासंघालाही (EU) परिणामांना सामोरे जावे लागू शकते. तसंच पुन्हा ते उलटणं कठीण होईल, असा इशारा गुरुवारी आर्थिक मुद्द्यांवर झालेल्या बैठकीत पुतिन यांनी दिला.

"जर असे घडले तर सर्व दोष फक्त आणि फक्त पाश्चात्य देशांवर जाईल, जे आपले जागतिक वर्चस्व राखण्यासाठी उर्वरित जगाचा त्याग करण्यास तयार आहेत,” असंही ते म्हणाल्याचं वृत्तसंस्था TASS नं म्हटलंय. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसंच सर्वात कमकुवत देशांना या मोठा फटका बसत आहे.

रशियाविरोधातील निर्बंध जागतिक आर्थिक संकटाकडे नेत आहेत. हे निर्बंध लागू करण्यासाठी मोठ्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि रुसोफोबिया (रशियाची भिती) ही कारणं होती. यामुळे त्यांनी आपल्याच अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांच्या भल्याला नुकसान पोहोचवल्याचं पुतिन यांनी सांगितलं.

"निर्बंधांमुळे जागतिक संकट निर्माण होत आहे आणि युरोपियन महासंघ व उपासमारीचा धोका असलेल्या जगातील काही गरीब देशांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. रशियन अर्थव्यवस्थेने पाश्चात्य निर्बंधांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे आणि रशियन कंपन्या पाश्चात्य उद्योगांच्या परत येण्यामुळे उरलेली पोकळी भरून काढतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धानंतर युरोपियन महासंघ आणि अमेरिकेनं रशियावर तात्काळ आणि गंभीर आर्थिक निर्बंध लावसे. दरम्यान, यापूर्वी जी ७ नं व्लादिमीर पुतिन यांची निंदा केली. तसंच युद्ध थांबवण्याचीही मागणी केली.

"पुतिन यांच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे जागतिक अन्नसुरक्षेवर गंभीर ताण येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह, आम्ही रशियाला इतर सर्व गोष्टी संपवण्याचे आवाहन करतो,” असं जी ७ नं सयुक्त निवेदनाद्वारे सांगितलं.

डोनेट्स्क आणि लुहान्स्क यांना स्वंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली. रशियन संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की हे केवळ युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. प्रत्युत्तर म्हणून, पाश्चात्य देशांनी रशियावर व्यापक निर्बंध लादले आहेत.