वर्षअखेरीस भीषण संघर्ष, शहरावरील हल्ल्यानंतर रशियाचं युक्रेनला थरकाप उडवणारं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 01:30 PM2023-12-31T13:30:41+5:302023-12-31T13:34:27+5:30

Russia Ukraine War: वर्षाच्या अखेरीच रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानं पुन्हा एकदा भीषण रूप धारण केलं आहे.

वर्षाच्या अखेरीच रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानं पुन्हा एकदा भीषण रूप धारण केलं आहे.

२९ डिसेंबर रोजी युक्रेनने रशियाच्या बेलगोरोड शहरावर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात रशियाच्या १४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनला निर्वाणीचा इशारा दिला होता.

त्यानंतर रशियाने युक्रेनमधील शहरं आणि गावांवर तब्बल १५८ क्षेपणास्त्र डागून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये युक्रेनमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर रशियाने युक्रेनमधील मेरिंका शहरावर कब्जा केला आहे, असा दावा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केला. नव्याने उद्भवलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. रशियन सैन्याने रहिवासी इमारतींना लक्ष्य केले आहे. त्यात आमच्या ३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये १२० हून अधिक वस्त्या नष्ट झाल्या आहेत. आम्ही रशियासमोर झुकणार नाही.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावलंय, त्यांच्याप्रति मी सहानुभूती व्यक्त करतो. पीडितांना पायाभूत मदत करण्याची खूप आवश्यकता आहे. ज्यांची घरं आणि अपार्टमेंट नष्ट झाल्या आहेत. त्यांना मदत करावी लागेल. सरकार आणि स्थानिक अशा दोन्ही पातळीवर हे काम कगावं लागेल.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, खारकीव्हमध्येही एक बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. तिथे १७ जण जखमी झाले आहेत. खारकीव्हमध्येही रशियानं हल्ले केले आहेत. युक्रेनमधील अनेक शहरांचं रशियाच्या हल्ल्यात नुकसान झालं आहे.