अणुहल्ल्यात ब्रिटनला समुद्रात बुडवण्याची पुतीन यांची तयारी, नकाशावरुन अमेरिका मिटणार; रशियन कर्नलचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 02:48 PM2022-10-28T14:48:00+5:302022-10-28T14:58:59+5:30

Putin Russia Nuclear Drills: युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियन सैन्याच्या अण्वस्त्र सरावाने जग हादरले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धात अणुबॉम्बचा वापर करणार नसल्याचे जाहीर केले होते, मात्र त्यानंतरही लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.

अण्वस्त्र चाचणी दरम्यान पुतीन यांनी ब्रिटन आणि अमेरिकेला पृथ्वीच्या नकाशावरून नष्ट करुन टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा दावा रशियन लष्करी तज्ज्ञाने केला आहे. या जोरदार अण्वस्त्र सरावात रशियाने अनेक क्षेपणास्त्रे डागली आणि पाश्चात्य देशांवर हल्ले करण्याचा सराव केला.

पुतीन यांनी स्वतः रशियन क्षेपणास्त्रांचा वर्षाव पाहिला. रशियाच्या नॅशनल डिफेन्स मॅगझिनचे संपादक कर्नल इगोर कोरोत्चेन्को यांनी सांगितले की, रशियावर अण्वस्त्र हल्ला झाल्यास ब्रिटन आणि अमेरिका कशा प्रकारे नष्ट होतील, हे याची रणनिती सराव दरम्यान पडताळून पाहण्यात आली.

रशियाच्या हल्ल्यात ब्रिटन अटलांटिक महासागरात बुडेल, असे ते म्हणाले. त्याचवेळी, अमेरिकेवर रशियानं अणुहल्ला केल्यानंतर तिथं एक नौदल सामुद्रधुनी तयार होईल, ज्याला कॉम्रेड स्टॅलिनचे नाव दिले जाईल.

कर्नल इगोर यांनी रशियन सरकारच्या वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार युक्रेन युद्धाच्या मध्यभागी या धोरणात्मक प्रशिक्षण सरावाचा उद्देश होता, ज्याला ऑपरेशन थंडर असे नाव देण्यात आले होते. ते म्हणाले की, 'रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी स्पष्ट केले आहे. शत्रूने रशियावर केलेल्या अण्वस्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आण्विक क्षेपणास्त्रांचा भीषण प्रतिहल्ला करण्याचा सराव करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली.

"रशियावर प्रथम अणु क्षेपणास्त्राने हल्ला कोण करू शकतो? अमेरिका आणि ब्रिटन", असंही कर्नल इगोर म्हणाले. तसंच त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन रशियावर अण्वस्त्राने हल्ला करतील असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

"आम्ही सत्ता गाजवत नाही, पण जोरदार पलटवाराची परिस्थिती लक्षात घेऊन हा रशियन सराव करण्यात आला हे स्पष्ट आहे. या संदर्भात आम्ही आमच्या मुख्य शत्रूला ताकद दाखवणे फार महत्वाचे होते. कोणताही करार होणार नाही, आजच्या सरावातून एक इशारा (यूएस आणि यूकेला) दिला गेला आहे", असंही इगोर म्हणाले.