ImRan Khan: पाकव्याप्त पंजाबमध्ये पोटनिवणूक, शरीफांच्या गडात इम्रान खान बहुमताने जिंकले; काय अर्थ होतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:39 PM2022-07-19T12:39:41+5:302022-07-19T12:44:27+5:30

या साऱ्या विजयी लाटेवर स्वार होत, इम्रान खान यांनी पाकिस्तानात निवडणूक लावण्याची मागणी केली आहे.

पाकव्याप्त पंजाबमध्ये २० जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ला मोठा विजय मिळाला आहे. इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) यांच्याशी झालेला पीटीआयचा ही पहिलीच लढाई होती. ही निवडणूक का झाली? ते पाहुया...

यामध्ये इम्रान खान यांना १५ जागा मिळाल्या आहेत. तर शाहबाज यांच्या पक्षाला ४ आणि अपक्षाला एक जागा मिळाली आहे. एप्रिलमध्ये जेव्हा शरीफ यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा त्यांनी पंजाब प्रांतातील इम्रान यांचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. यामुळे बुजदार यांनी राजीनामा दिला होता.

यानंतर इम्रान यांनी सहकारी पक्षाचे PML-Q चे चौधरी परवेज इलाही यांना पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बनविले. या निवडणुकीत इम्रान यांच्या २५ आमदारांनी नवाज यांच्या पक्षाच्या हमजा शाहबाज यांना मतदान केले. इम्रान खान यांच्या याचिकेवरून निवडणूक आयोगाने या २५ आमदारांना अपात्र ठरविले. यामुळे ३७१ सदस्यांच्या या विधानसभेत २५ जागांवर पोटनिवडणूक लागली.

यापैकी पाच जागा या आरक्षित होत्या. त्यावर इम्रान यांनी मनोनीत सदस्यांना नियुक्त केले. गैर मुस्लिम कोट्यातून दोन आणि महिला कोट्यातून तीन जागा भरण्यात आल्या. यामुळे २० जागांवर निवडणूक लागली. यावर रविवारी निकाल जाहीर झाला.

आता हे रुप पालटले आहे. हमजा यांना बहुमतासाठी १८६ मतांची गरज आहे. तर त्यांच्याकडे १७९ मते आहेत. इम्रान खान यांच्याकडे १८८ मते आहेत. अपक्ष १ तर ३ जागा रिक्त आहेत.

यामुळे एप्रिलमध्ये पीटीआयचे आमदार फोडून सत्तेत आलेल्या हमजा यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत इम्रान खान यांच्या बाजुने आहे.

पोटनिवडणूकीत इम्रान खान यांनी २५ आमदारांना गद्दार ठरवण्यावरच भर दिला. तसेच नवीन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यास ते यशस्वी ठरले. त्यांना ८ मतदारसंघांत या नव मतदारांचा फायदा झाला.

२५ आमदारांना अपात्र ठरविल्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने पंजाब विधानसभेत मतदानाच्या पुर्न मोजणीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन झाले की हमजा शरीफ अल्पमतात येणार आहेत. कारण त्यांना 197 मते मिळाली होती. ती कमी होऊन १७२ होतील.

असे असले तरी इम्रान खान यांच्या उमेदवाराला १७२ मते मिळाली आहेत. यामुळे पुन्हा बहुमत चाचणी घेण्यासाठी इम्रान खान सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर न्यायालयाने अशी परिस्थिती आल्यास २२ जुलैला बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे.

या साऱ्या विजयी लाटेवर स्वार होत, इम्रान खान यांनी पाकिस्तानात निवडणूक लावण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानात ऑक्टोबर २०२३ मध्ये निवडणूक होणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीवर २१ अब्ज रुपये खर्च झाले होते. तर या वर्षीच्या जूनमध्ये पाकिस्तानवरील कर्ज 8.6 अब्ज डॉलर एवढे होते. इम्रान खान यांच्या मागणीनुसार जर निवडणुका लागल्या तर आयएमएफकडून मिळणारे ९०० दशलक्ष डॉलरच्या कर्जावर कात्री लागू शकते.