भयावह! चीनमध्ये पुन्हा रहस्यमयी आजार, मुलांनी भरली रुग्णालयं; WHO ने मागितला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:00 AM2023-11-23T11:00:49+5:302023-11-23T11:08:24+5:30

चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखा आजार पसरल्याची माहिती चीनने दिली आहे.

चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखा आजार पसरल्याची माहिती चीनने दिली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगकडे या रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती मागितली आहे.

रिपोर्टनुसार, चिनी रुग्णालये आजारी मुलांनी भरलेली आहेत. या मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली.

WHO ने या आजारासाठी कोरोना व्हायरसबाबत असलेले निर्बंध शिथिल करणं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाबाबत अतिरिक्त माहिती मागवली आहे.

चीनमध्ये लहान मुलं आजारी पडण्याच्या घटना या कोरोनासारख्याच आहेत. कोरोनासारखी लक्षणं पुन्हा दिसून येत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले होते.

आजारी मुलांच्या कुटुंबीयांचा हवाला देत एका चिनी वृत्तवाहिनीने सांगितले की, या आजाराची कोणतीही नवीन लक्षणं नाहीत, परंतु मुलांच्या शरीराचे तापमान वाढतच जाते आणि फुफ्फुसात गाठी तयार होतात.

चीनमधील रुग्णालयांमध्ये मुलांच्या उपचारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आजारावर लक्ष ठेवण्यासाठी वेबसाइट प्रोमेड मेल अलर्टमध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रुग्णांना 2 तास रांगेत थांबावे लागते आणि आम्ही सर्व आपत्कालीन विभागात आहोत.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रहस्यमय न्यूमोनियाच्या आजारामुळे अनेक शाळा बंद आहेत. न्यूमोनियाने बाधित झालेल्या मुलांमध्ये फुफ्फुसात सूज येणे आणि ताप येणे, यासह असामान्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, खोकला, आरएसव्ही आणि श्वसन रोगांशी संबंधित इतर लक्षणे त्या मुलांमध्ये दिसत नाहीत.

चायना डेली मधील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये श्वसन संक्रमणाच्या रोगांचा पीक सीझन आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे; या आजारामुळे काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :चीनchina