पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:17 IST2025-05-16T15:49:17+5:302025-05-16T16:17:58+5:30
भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तमाव सुरू झाला होता.
यावेळी भारतीय लष्कराने "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, यामुळे पाकिस्तानच्या भोलारी हवाई तळाचे मोठे नुकसान झाले.
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे एक महत्त्वाचे AWACS विमान नष्ट झाले आणि अनेक कर्मचारी मारले गेल्याचे आता एका निवृत्त पाकिस्तानी एअर मार्शल आणि सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे.
कबुलीजबाबांपैकी पहिल्या कबुलीजबाबात, पाकिस्तानने म्हटले होते की, ११ सैनिक मृत्युमुखी पडले आणि ७८ जखमी झाले. दोन रेंजर्स मारले गेले आहेत.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ६ ते १० मे दरम्यान "ऑपरेशन सिंदूर" सुरू केले.
या कारवाईत भारताने नूर खान, सरगोधा आणि भोलारी सारख्या ११ पाकिस्तानी हवाई तळांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यांचा उद्देश दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी हवाई दलाची ताकद कमकुवत करणे हा होता.
१० मे रोजी झालेल्या हल्ल्यात सिंध प्रांतातील जमशोरो जिल्ह्यात असलेल्या भोलारी हवाई तळाचे मोठे नुकसान झाले.
AWACS विमान ही एक उडणारी रडार प्रणाली आहे. ही हवेत शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मागोवा घेते. युद्धादरम्यान रणनीती बनविण्यास मदत करणारे हवाई दलाचे "डोळे आणि कान" हेच आहेत.
एका AWACS विमानाची किंमत आणि महत्त्व १५ लढाऊ विमानांपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानकडे फक्त काही AWACS विमाने आहेत, त्यापैकी बहुतेक विमाने चीनने पुरविली आहेत. जर भोलारीमध्ये AWACS नष्ट झाले असेलतर ते पाकिस्तानी हवाई दलासाठी मोठा धक्का असेल.
भोलारी एअरबेसवर भारताच्या ब्राह्मोस हल्ल्यात एक AWACS विमान पूर्णपणे नष्ट झाल्याचे निवृत्त पाकिस्तान एअर मार्शल मसूद अख्तर यांनी एका मुलाखतीत कबूल केले. ते म्हणाले की, भारताने चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली, चौथे क्षेपणास्त्र एअरबेसच्या हँगरवर आदळले, जिथे AWACS आणि कदाचित F-16 लढाऊ विमान होते.
सॅटेलाईट फोटोमध्ये हँगरला आग लागली आणि विमाने उघड्यावर जळून खाक झाल्याचे सॅटेलाईट फोटोमध्ये दिसत आहे.
सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनीही या हल्ल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, भोलारी हवाई तळावर झालेल्या भारतीय हवाई हल्ल्यात सात जण ठार झाले, त्यापैकी सहा जण पाकिस्तानी हवाई दलाचे तांत्रिक कर्मचारी होते. हे कर्मचारी विमान आणि उपकरणांची काळजी घेत होते. त्यांच्या मृत्यूमुळे एअरबेसच्या कार्यक्षमतेवर आणखी परिणाम झाला.