आशेचा किरण! "या" लसीची कमाल, पहिल्या डोसनंतर कोरोनाच्या संसर्गात 67 टक्क्यांनी घट, रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 01:37 PM2021-02-04T13:37:36+5:302021-02-04T13:48:23+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच लसीबाबत एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 104,926,829 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2,278,902 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.

जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा समान करत आहे. युद्धपातळीवर संसर्ग रोखण्याचं काम सुरू असून काही ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. लसीकरणाची मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.

कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच लसीबाबत एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक लसी या शर्यतीत पुढे असून एस्ट्राजेनेका लसीला मोठं यश मिळालं आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनी यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण 67 टक्क्यांनी कमी झालं आहे.

कोरोनाच्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या संकटात लस परिणामकारक ठरत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

रिसर्चमध्ये लोकसंख्येतील संसर्गग्रस्तांची संख्या कमी करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर या लसीचा मोठा परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच लसीमुळे होणारा फायदाही अधिक आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑक्सफर्डच्या लसीची ही बातमी खरंच खूप उत्तम आहे. ऑक्सफोर्डची लस घेतल्यानंतर फक्त रुग्णालयात दाखल कराव्या लागण्याच नव्हे तर लक्षणं नसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दोन-तृतीयांश कमी आली आहे."

संसर्गात दोन तृतीयांश घट, दोन डोसमधील 12 आठवड्यांच्या अंतरातही उत्तम संरक्षण आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही अशी त्याची वैशिष्ट्यं आहेत. ही लस उत्तम पद्धतीने कार्य करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाची ही लस वृद्धांमध्येही नोव्हेल कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी परिणामकारक ठरल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रिसर्चमधून समोर आली होती. वृद्धांमध्ये इम्यून रिस्पॉन्स विकसित करण्यासाठी ही यशस्वी ठरली आहे.

फायनॅंशियल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार या लसीमुळे वृद्धांच्या शरीरात प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीजचा विकास झाला आहे. या रिपोर्टमध्ये रिसर्चशी निगडीत असलेल्या दोन गोष्टींचा हवाला देण्यात आला होता.

एस्ट्राजेनेका या कंपनीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांसह मिळून ही लस तयार केली आहे. या लसीची एडवान्स चाचणी भारतात सुरू आहे. भारतात या लसीला कोविशिल्ड असे नाव देण्यात आले आहे.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने एक्स्ट्राजेनकाने कोविशिल्ड या लसीसाठी 100 कोटी डोसचा करार केला आहे. जुलैमध्ये ऑक्सफोर्डची लस आणि इम्यूनोजेनिसिटीच्या माहिती देण्यात आली होती.

रक्त तपासणी रिपोर्टनुसार तेव्हा लस 18 ते 55 वर्ष वयोगटातील स्वयंसेवकांसाठी लस परिणामकारक ठरली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात असून काळजी घेण्यात येत आहे.

Read in English