"कुत्र्यांवर करायचा केमिकल शस्त्रांची चाचणी अन्...", ओसामा बिन लादेनच्या मुलानं केली पोलखोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:39 AM2022-12-02T09:39:01+5:302022-12-02T09:46:12+5:30

अमेरिकेन ठार केलेल्या अल कायदाचा सर्वात भयंकर दहशतवादी ओसामा बिन लादेनबद्दल त्याच्या मुलानं खळबळजनक खुलासे केले आहेत. बिन लादेनचा मुलगा ओमर बिन लादेननं दावा केला आहे की त्याचे वडील त्याला त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं प्रशिक्षण देत होते. याचा अर्थ लादेनला त्याच्या मुलानं त्याच दिशेनं पुढे जावं, ज्या दिशेनं तो स्वत: चालत होता, अशी त्याची इच्छा होती.

आपल्यानंतर आपल्या मुलानं अल कायदाची कमान हाती घ्यावी, अशी लादेनची इच्छा होती. ओमरनं सांगितलं की, "मी लहान असताना, त्यांनी [लादेन] मला अफगाणिस्तानात बंदूक चालवायला लावली आणि माझ्यासमोर कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केली होती"

बिन लादेनचा मुलगा ओमरनं कतार भेटीदरम्यान 'द सन' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण वडिलांसोबतचा वाईट काळ विसरण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यानं सांगितलं. व्यवसायानं चित्रकार असलेला ४१ वर्षीय ओमर आता पत्नी जैनासोबत फ्रान्समध्ये राहतो.

ओमरनंच्या माहितीनुसार बिन लादेननं त्याला सांगितलं होतं की त्यानं त्याचं काम सुरू ठेवण्यासाठी आपली निवड केली होती. परंतु न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबर ११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी एप्रिल २००१ मध्येच उमरनं अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.

"मी त्या जगाचा निरोप घेतला. पण ते (ओसामा बिन लादेन) त्यावर खूश नव्हते. त्यांनी (लादेनच्या गुंडांनी) माझ्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांचा प्रयोग केला आणि मला त्यात अजिबात आनंद झाला नाही. वाईट काळ विसरण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. हे खूप कठीण आहे. याच्या आजही मला वेदना होतात'', असं ओमर म्हणाला.

लादेनची पहिली पत्नी नजवा हिच्या पोटी मार्च १९८१ मध्ये सौदी अरेबियात जन्मलेला ओमर म्हणाला की, ''त्यानं (लादेन) मला एक सुरक्षित भावना दिली होती. जणू मला कोणी हात लावू शकत नाही. त्यानं मला कधीच अल-कायदामध्ये सामील होण्यास सांगितलं नाही. पण त्यांचं काम पुढे नेण्यासाठी माझी निवड झालेली असल्याचं मला निश्चितपणे सांगण्यात आलं होतं. पण मी यासाठी योग्य नाही असं सांगितल्यावर ते निराश झाले होते"

वडिलांनी तुझी उत्तराधिकारी म्हणून निवड केली तेव्हा काय वाटलं यावर ओमर म्हणाला की 'मला माहीत नाही. कदाचित मी जास्त हुशार असल्यामुळेच मी अजूनही जिवंत आहे''.

ओमरची ६७ वर्षीय पत्नी झैना म्हणाल्या की ओमरनं आजवर खूप खूप त्रास सहन केला आहे आणि खूप वाईट तणाव, दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. तो एकाच वेळी ओसामावर प्रेम आणि द्वेषही करतो. तो त्याच्यावर प्रेम करतो कारण तो त्याचा पिता होता. पण लादेननं केलेल्या कृत्याबद्दल तो त्याच्या वडिलांचा खूप तिरस्कार करत, असंही झैना सांगतात.