Corona Vaccine: अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 04:45 PM2021-08-11T16:45:47+5:302021-08-11T16:51:21+5:30

Corona Vaccine: जर्मनीत हा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, लसीच्या ऐवजी मिठाचे पाणी टोचले आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा काहीशी चिंता वाढवणारा ठरत आहे. जागतिक स्तरावरही दुसऱ्या लाटेमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा जगभरात कहर कायम असून, याची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसल्याचे सांगितले जात आहे. कोरोना नियंत्रणसाठी सर्व देशांमध्ये लसीकरणावर भर दिला जात आहे.

यातच एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका नर्सने सुमारे ९००० जणांना लसीच्या ऐवजी मिठाचे पाणी टोचले आहे. ही घटना एप्रिल महिन्यातील आहे. मात्र या घटनेचा खुलासा आता झाला आहे.

जर्मनीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, चांगली गोष्ट म्हणजे या लोकांना दिलेले मीठ पाण्याचे इंजेक्शन हानिकारक नव्हते. एप्रिलमध्ये फायझर लसीची कुपी सांडल्यानंतर, एका जर्मन नर्सने मिठाच्या पाण्याची कुपी उचलली आणि लोकांना लस दिली.

यानंतर एका स्थानिक अधिकाऱ्याने या सर्व स्थानिक रहिवाशांना कॉल केले आणि त्यांच्या आरोग्याबाबत जाणून घेतले. तसेच त्यांना आणखी एक करोना डोस घेण्यासही सांगितले.

या घटनेचा तपास करत असलेले पोलीस दलातील अधिकारी पीटर बीअर यांनी एका पत्रकार परीषदेत सांगितले की, साक्षीदारांच्या स्टेटमेंटनुसार हे खूप धोकादायक होते. अज्ञात नर्सचा हेतू स्पष्ट नव्हता, तिने सोशल मीडिया पोस्टमध्येदेखील लसीबद्दल संशयास्पद मते पसरवली होती.

दरम्यान, भारतात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डचा मिक्स डोस देण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परवानगी दिली आहे. जर्मनी, थायलंड, कॅनडा आणि स्पेन या देशांतही कोरोनाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अभ्यास आणि याचे क्लिनिकल ट्रायल वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या वतीने आयोजित केले जातील. जगातील काही मोठ्या देशांतही यासारखे प्रयोग सुरू झाले आहेत.

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले. या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास त्यामुळे रुग्णाला कोणताही अपाय होत नाही व त्याची प्रतिकारशक्तीही इतर वेळेपेक्षा अधिक वाढते. ९८ जणांवर केलेल्या प्रयोगांनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये १८ जणांना नजरचुकीने दोन्ही लसी दिल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीचाही यात अभ्यास करण्यात आला. त्यांच्यावर कोणताही विपरित परिणाम झाल्याचे आढळले नाही. दोन लसींचे मिश्रण करून ते रुग्णांना दिल्यानंतर नेमका काय परिणाम होतो, असा अभ्यास देशात याआधी झाला नव्हता.

आयसीएमआरने म्हटले आहे की, ज्या रुग्णांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्या तुलनेत दोन्ही लसींचे मिश्रण घेतलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. विषाणूच्या अल्फा, बिटा, डेल्टा या प्रकारांविरोधात लसींचे मिश्रण परिणामकारक ठरले आहे.

रशियात Sputnik-V आणि AstraZeneca च्या डोसचे कॉकटेल तयार करण्यात आले. डेन्मार्क येथे करण्यात आलेल्या चाचणीत अ‍ॅस्ट्राझेनेकाचा पहिला डोस दिल्यानंतर, दुसरा डोस फायझर अथवा मॉडर्ना लसीचा देण्यात आला. दक्षिण कोरियातील अभ्यासानुसार, अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस आणि फायझरचा दुसरा डोस घेतल्यास, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या दोन्ही डोसच्या तुलनेत ६ पट अधिक चांगले संरक्षण मिळते.

Read in English