नासाचं मिशन Artemis II, ४ अंतराळवीरांसह चंद्राला प्रदक्षिणा घालणार, ६ नवे विक्रम रचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:02 IST2026-03-31T11:43:12+5:302026-03-31T12:02:52+5:30
Mission Artemis II: पृथ्वीचा उपग्रह आणि आबालवृद्धांचा लाडका चांदोमामा असलेल्या चंद्राबद्दल मानवाला सुरुवातीपासूनच कुतुहल राहिलेलं आहे. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच मानवाने चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्र मोहिमांच्या माध्यमातून नील आर्मस्ट्राँगसह काही अंतराळवीर हे चंद्रावरही जाऊन आले आहेत. या चंद्रमोहिमांनंतर आता नासाने पुन्हा एका एक महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम हाती घेतली असून आट्रेमिस II या मोहिमेंतर्गत ५४ वर्षांनंतर मानव हा चंद्राजवळ जाणार आहे.

पृथ्वीचा उपग्रह आणि आबालवृद्धांचा लाडका चांदोमामा असलेल्या चंद्राबद्दल मानवाला सुरुवातीपासूनच कुतुहल राहिलेलं आहे. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच मानवाने चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्र मोहिमांच्या माध्यमातून नील आर्मस्ट्राँगसह काही अंतराळवीर हे चंद्रावरही जाऊन आले आहेत. या चंद्रमोहिमांनंतर आता नासाने पुन्हा एका एक महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम हाती घेतली असून आट्रेमिस II या मोहिमेंतर्गत ५४ वर्षांनंतर मानव हा चंद्राजवळ जाणार आहे.

या चंद्रमोहिमेंतर्गत बुधवार १ एप्रिल रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून चार अंतराळवीर हे ओरियन कॅप्सूलमध्ये बसून महाकाय एसएलएस रॉकेटमधून चंद्राच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. ही मोहीम सुमारे १० दिवसांची असणार आहे. तसेच यामध्ये चंद्राला चहुबाजूंनी प्रदक्षिणा घालून हे अंतराळवीर पृथ्वीवर येणार आहेत. हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार नसले तरी नासाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान अनेक नवे विक्रम रचले जाणार आहेत. हे विक्रम खालील प्रमाणे.

पृथ्वीपासून सर्वात लांबचा प्रवास
आर्टेमिस II मधील अंतराळवीर पृथ्वीपासून सर्वात लांब जाणार आहेत. यादरम्यान, ते पृथ्वी ते चंद्रादरम्यानचं ४ लाख २ हजार किलोमीटर एवढं अंतर पार करणार आहेत. हे अंतर अपोलो १३ मोहिमेतीत अंतरापेक्षा २ हजार ४१४ किमी अधिक अंतर आहे. ही मोहीम फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरीवर चालणार आहेत. यात अंतराळवीर चंद्राच्या मागच्या बाजूने फिरून रॉकेट न सुरू करता माघारी परतणार आहेत.

सर्वात वेगवान पुनरागमन, सर्वात अधिक वेग
या मोहिमेदरम्यान, अंतराळवीर हे पृथ्वीवर परत येताना सर्वात अधिक वेगाने येणार आहेत. पृथ्वीवर परत येताना या अंतराळवीरांच्या यानाचा ताशी वेग ४० हजार २०० किमी हून अधिक असणार आहे. यादरम्यान, हे यान अपोलो १० चा विक्रम मोडित काढणार आहे.

चंद्राजवळ जाणारा पहिला कृष्णवर्णीय अंतराळवीर
या मोहिमेदरम्यान, पायलट व्हिक्टर ग्लोवर हे नवा इतिहास रचणार आहेत. ते चंद्राजवळ जाणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर बनणार आहेत. व्हिक्टर ग्लोवर हे आधी अंतराळ स्थानकाज जाऊन आले आहेत. तसेच स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचं सारथ्य करणारे ते पहिले व्यक्ती आहेत.

चंद्राजवळ जाणारी पहिली महिला
या मोहिमेतील विशेषज्ञ क्रिस्टिना कोच ह्या पृथ्वीवरून चंद्राजवळ जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. त्यांनी याआधी अंतराळ स्थानकामध्ये सर्वाधिक काळ स्पेस फ्लाईट करण्याचा विक्रम रचला होता.

चंद्राजवळ जाणार पहिला बिगर अमेरिकन अंतराळवीर
कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हेनसेन हे या मोहिमेद्वारे चंद्राजवळ जाणारे पहिले बिगर अमेरिकन अंतराळवीर ठरणार आहेत. ते ५० वर्षांचे आहेत. तसेच त्यांचा अंतराळातील हा पहिलाच प्रवास असेल.

चंद्राजवळ जाणारा सर्वात वयस्कर अंतराळवीर
या मोहिमेत समावेश असलेले रीड वाईसमेन हे चंद्राजवळ जाणारे सर्वात वयस्कर अंतराळवीर ठरणार आहेत. ते ५० वर्षांचे आहेत. याआधी अपोलो १४ मोहिमेतील अॅलन शेफर्ड हे ४७ वर्षांचे होते.

















