'मिशन खामेनेई', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू होईपर्यंत डोनाल्ड ट्रम्प होते नजर ठेवून, 'त्या' वॉर रुममधील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:43 IST2026-03-03T09:36:39+5:302026-03-03T09:43:33+5:30

अमेरिकेने इराणविरोधात ऑपरेशन 'एपिक फ्युरी'सुरू केले आणि त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारण्यात आले. या ऑपरेशनवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नजर ठेवून होते.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केले आणि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली. भरदिवसा अमेरिका आणि इस्रायलने बंकरमध्ये महत्त्वाच्या लोकांसोबत बैठक घेत असलेल्या अली खामेनेई यांना बॉम्बचा वर्षाव करत संपवण्यात आले.

इस्रायलच्या फायटर विमानांनी सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.४० मिनिटांनी अयातुल्लाह अली खामेनेई असलेल्या कंपाऊंडवर हल्ला केला. ३० बॉम्ब टाकण्यात आले. त्यात बंकर उद्ध्वस्त झाले आणि खामेनेईंसह इतर काही महत्त्वाची माणसे मारली गेली.

ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू करण्यात आल्यानंतर खामेनेईंना संपवण्यापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वॉर रुममध्ये बसून होते. त्यांचे काही फोटो आता व्हाईट हाऊसने जारी केले आहेत. फ्लोरिडातील मार ए लागो या रिसॉर्टमध्ये तात्पुरत्या स्वरुपात ही वॉर रुम तयार करण्यात आली होती. यावेळी त्यांचे काही मंत्रीही या रुममध्ये होते.

अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारण्याचा प्लॅन आधीच तयार करण्यात आला होता. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नजर ठेवली जात होती. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून होत्या.

हेरगिरी यंत्रणा आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टिमचा वापर खामेनेई यांच्या हालचाली टिपण्यासाठी केला गेला. यातूनच खामेनेई यांचा दिनक्रम आणि त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण याचीही माहिती जुळवली गेली होती. त्यानंतरच २८ फेब्रुवारी २०२६ रोजी खामेनेई यांना संपवण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले.

इस्रायलमधील स्थानिक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने काही रिपोर्ट्स प्रसिद्ध केले आहेत. ज्यात म्हटले आहे की, अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारण्यात आल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे फोटो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जमीन नेतन्याहू यांना दाखवण्यात आले होते.

खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याबद्दलची घोषणा केली. इस्रायलच्या मदतीने हे ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांच्यामुळे त्रासलेल्या लोकांना न्याय मिळाला आहे, असे ट्रम्प म्हणाले होते.