महायुद्धाचं सावट! मध्य पूर्वेतील तणावातच हुकूमशहा किम जाँग उननं तयार केला नवा 'समुद्री राक्षस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 09:39 IST2026-03-07T09:32:44+5:302026-03-07T09:39:46+5:30

अमेरिका इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच या युद्धाची धग हळूहळू इतर देशांनाही बसत आहे. मध्य पूर्वेनंतर आता कोरियन बेटावर पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहचला आहे. येत्या ९ मार्चला अमेरिका, दक्षिण कोरियासोबत मिळून सैन्य अभ्यास करण्याची तयारी करत आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील हा संयुक्त सराव लक्षात घेता उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्या नव्या विनाशक तयारीने संपूर्ण क्षेत्राला हाय अलर्टवर टाकले आहे. किम जाँग उन यांनी उचलेलं पाऊल केवळ नियमित चाचणी म्हणून पाहिले जात नाही तर अलीकडेच इराणवरील अमेरिकन हल्ल्यांना थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर म्हणून मानले जाते.

मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जगात पसरलेले युद्धाचे सावट यात सुरक्षेचा एकमेव पर्याय म्हणून अण्वस्त्र क्षमता वाढवणे हे उत्तर कोरियाला वाटते. आमचे नौदल पाण्याच्या खालून आकाशापर्यंत प्रहार करण्यासाठी तयार होत आहे असं किम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ९ मार्च तारीख जसजशी जवळ येतेय तसं अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या या हालचालींवर किम यांचं पुढचे पाऊल काय असेल याची उत्सुकता जगाला लागली आहे.

उत्तर कोरियाने नुकतेच ५ हजार टन वजनाच्या नौदलाच्या युद्धनौकेवरून एका स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाइलची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्र चाचणी ५,००० टन वजनाच्या नवीन डेस्ट्रॉयर Choe Hyon वरून करण्यात आली. त्यानंतर ही युद्धनौका अधिकृतपणे नौदलात दाखल करण्यात आली आहे. चाचणीदरम्यान कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन देखील उपस्थित होते.

माहितीनुसार, ही चाचणी पश्चिम किनारपट्टीवरील Nampo Shipyard येथून करण्यात आली. यावेळी किम जाँग उन यांनी नव्या युद्धनौका Choe Hyon हून समुद्रातून जमिनीवर मारक मिसाइलची चाचणी पाहिली. ही या युद्धनौकेची प्रमुख क्षमता असल्याचे सांगत हे जहाज देशाच्या सागरी रक्षेचे नवीन प्रतिक बनेल असंही किम यांनी म्हटलं आहे.

या युद्धनौकेचे वजन ५ हजार टन आहे. जे Choe Hyon Class Destroyer या नावाने तयारी केली जात आहे. ही युद्धनौका आधुनिक मिसाइल आणि एअर डिफेन्स सिस्टमने सज्ज आहे. ही आतापर्यंतची उत्तर कोरियातील सर्वाधिक आधुनिक आणि प्रचंड वजनाच्या जहाजांपैकी एक मानली जाते.

हे विनाशक युद्धनौका समुद्र, हवा आणि जमीन या तिन्ही दिशांवरून येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. याला मल्टी रोल कॉम्बॅट मिशनसाठी डिझाइन केलेले आहे. या जहाजावर लांब पल्ल्याच्या गाइडेड मिसाइल्स तैनात करता येतात. ज्या शत्रूच्या युद्धनौका आणि जमिनी ठिकाणांना टार्गेट करू शकतात.

या युद्धनौकेत आधुनिक एअर डिफेन्स सिस्टम प्रणाली आहे. जे शत्रूच्या फायटर जेट, ड्रोन आणि मिसाइलला हवेतच मारण्याची क्षमता ठेवते. या युद्धनौकेत प्रगतशील रडार आणि सेंसर लावण्यात आले आहेत. किम जाँग उन यांनी उत्तर कोरियाला अशाच प्रकारे आणखी सुसज्ज युद्धनौका बनवायला हवी यावर भर दिला.

हे जहाज उत्तर कोरियामध्ये बांधल्या जाणाऱ्या Choe Hyon Class Destroyer या मालिकेतील पहिले जहाज आहे. गेल्या वर्षी उत्तर कोरियाच्या नौदल आधुनिकिकरण कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. मे २०२५ मध्ये दुसऱ्या युद्धनौकेच्या लॉन्चिंगवेळी चोगजिन शिपयार्डमध्ये एक अपघात झाला आणि हे जहाज उलटले होते.

उत्तर कोरिया सातत्याने त्यांच्या अण्वस्त्रे आणि मिसाइल कार्यक्रमाला मजबूत करत आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या वाढत्या जवळकीमुळे उत्तर कोरियाला सैन्य क्षमता वाढवणे गरजेचे वाटत आहे. किम जाँग उन सत्तेत आल्यानंतर त्यांनी सैन्य आणि अण्वस्त्र कार्यक्रमाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याशिवाय आर्थिक सुधारणेवरही त्यांनी भर दिला.