कोरोना पाठोपाठ नवं संकट! घातक मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; जगभरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:49 PM2021-08-10T13:49:38+5:302021-08-10T13:54:53+5:30

Marburg virus; कोरोना, इबोलापेक्षा धोकादायक विषाणू सापडला; एकाचा मृत्यू

गेल्या पावणे दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. या संकटातून अद्याप जग सावरलेलं नाही. कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरणाला वेग दिला जात आहे. त्यातच कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट चिंतेत भर घालत आहेत. त्यामुळे पुढील लाटेचा धोका कायम आहे.

कोरोनाचं संकट कायम असताना पश्चिम आफ्रिकेतल्या गिनी देशात मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. मारबर्ग विषाणू इबोला आणि कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे.

मारबर्ग विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे गिनीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मारबर्ग विषाणू वटवाघूळांच्या माध्यमातून पसरतो.

२ ऑगस्टला दक्षिण गुएकेडो प्रांतात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरात मारबर्ग विषाणू सापडला. शवविच्छेदनातून ही माहिती समोर आली.

मारबर्ग विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी त्याला ट्रॅक करण्याची गरज असल्याचं आफ्रिकेतील जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय संचालक मात्शिदिसो मोएती यांनी सांगितलं.

गिनीमधील इबोला विषाणूचा खात्मा झाल्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर आता गिनीमध्ये मारबर्ग विषाणू सापडला आहे.

गेल्याच वर्षी गिनीमध्ये इबोला संकट निर्माण झालं. त्यात १२ जणांचा बळी गेला. यानंतर आता देशावर मारबर्ग विषाणूमुळे नवं संकट ओढावलं आहे.