इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:37 IST2025-06-21T16:27:15+5:302025-06-21T16:37:40+5:30

इराण-इस्त्रायल युद्धात रशिया आणि चीनने पुढाकार घेत युनाइटेड फ्रंट बनवण्याची घोषणा केली आहे. इस्त्रायल ज्याप्रकारे युद्धात अमेरिकेला ओढण्याचा प्रयत्न करत आहे. ते कमी करण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी आवाहन केले आहे.
गुरुवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या फोनवरून संभाषणात दोन्ही नेत्यांनी इस्रायलच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. शी जिनपिंग आणि पुतिन यांनी अशा वेळी फोनवर चर्चा केली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणी राष्ट्राध्यक्षांना मारण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्याची धमकी दिली होती.
सूत्रांनुसार, रशिया आणि चीनच्या राष्ट्रपतींमध्ये जो संवाद झाला त्यात इराणवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. इस्रायलचा निषेध करण्याऐवजी, चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धात सहभागी असलेल्या दोन्ही देशांना, विशेषतः इस्रायलला प्रादेशिक संघर्ष पसरू नये आणि लवकरच युद्धबंदी व्हावी म्हणून युद्ध वाढवू नये असे आवाहन केले आहे.
त्याशिवाय अनेक रिपोर्टमध्ये चीनचे एअरक्राफ्ट इराणमध्ये उतरल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय चीन इराणला शस्त्रे पुरवत असल्याचे समोर आले. चीन दीर्घ काळापासून अमेरिकेला मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण करण्यासाठी जबाबदार धरत आहे. शांघाय इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीचे मध्य पूर्व तज्ज्ञ लिऊ झोंगमिन यांनी सध्याच्या परिस्थितीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाला जबाबदार धरले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत अस्थिरता आणि अराजकता निर्माण केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या धोरणाचे अधिकार आणि विश्वासार्हता गंभीरपणे कमकुवत केली आहे. अमेरिकेचे नेतृत्व आणि त्याच्या मित्र राष्ट्रांमधील प्रतिमा नष्ट केली आहे आणि प्रादेशिक विरोधकांना धमकावण्याची आणि रोखण्याची क्षमता कमकुवत केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेला अनिश्चित काळासाठी युद्धात ओढत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी वारंवार यावर भर दिला आहे की इंडो-पॅसिफिकमधील चीनच्या महत्त्वाकांक्षेला तोंड देण्यासाठी वॉशिंग्टनने आपले लक्ष आणि संसाधने पुन्हा तैनात करावीत. तरीही पाच महिन्यांनंतर युक्रेन आणि गाझामधील युद्ध सुरूच आहे आणि आता अमेरिका इस्रायलशी युद्धात उतरण्याची योजना आखत आहे असं अनेक चिनी तज्ज्ञांचे म्हणणे आहे
दुसरीकडे चीनला इराणमधील अयातुल्ला अली खामनेई यांच्या राजवटीचा अंत नको आहे. सर्वोच्च नेते खामनेई यांच्या नेतृत्वाखाली इराण मध्य पूर्वेतील एक प्रबळ शक्ती आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारा म्हणून उदयास आला आहे. अशाच प्रकारे चीन आता अमेरिकेच्या सत्तेला आव्हान देत आहे.
२०२३ मध्ये सौदी अरेबिया आणि इराणला मित्र बनवून चीनने अमेरिकेला आश्चर्यचकित केले. तेल आयात आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवून चीनने इराणला दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. गेल्या काही वर्षांत चीन आणि इराणने संयुक्त नौदल सराव करून त्यांचे धोरणात्मक संबंध अधिक दृढ केले आहेत. बीजिंगने शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्समध्ये तेहरानचे स्वागत केले.
या गटात भारत, चीन आणि रशियाचा समावेश आहे, जो अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या G7 ला प्रत्युत्तर देणारे एक संघटना मानले जाते. याशिवाय इराण हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) चा देखील एक महत्त्वाचा सदस्य आहे. चीनने पुढील काही वर्षांत इराणमध्ये ४०० अब्ज गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इराण हा रशियासाठी देखील एक अतिशय महत्त्वाचा देश आहे. इस्रायल-इराण संघर्ष थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. जर अमेरिकेने इस्रायलसह इराणवर हल्ला केला तर ते संपूर्ण क्षेत्र युद्धात उतरू शकतेच शिवाय अमेरिकेच्या जागतिक विश्वासार्हतेलाही गंभीर नुकसान पोहोचवू शकते.