FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:44 IST2025-11-26T15:38:50+5:302025-11-26T15:44:59+5:30
अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक भारतीय वंशाचे काश पटेल हे वादात सापडले. त्यांनी सरकारी सुरक्षा गर्लफ्रेंडला दिल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर त्यांची हकालपट्टी होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केले.

भारतीय वंशाचे अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक काश पटेल वादात सापडले. त्यांनी गर्लफ्रेंड एलेक्सिस विल्किंसला Swat कमांडोंची सुरक्षा पुरवल्याचा आणि सरकारी साधनांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

काश पटेल यांच्यावर असाही आरोप करण्यात आला की, त्यांनी १२ खासगी दौरे करण्यासाठी सरकारी विमानांचा वापर केला. त्यामुळे करदात्यांचा पैसा खासगी नात्यांवर खर्च केला जात असल्याची चर्चा सुरू झाली.

हा वाद निर्माण झाल्यानंतर काश पटेल एफबीआयचे संचालक राहणार की नाही, अशीही चर्चा सुरू झाली. यात आणखी एक कारण म्हणजे काश पटेल यांचा ट्रम्प समर्थकांसोबतच संघर्ष सुरु असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काश पटेल यांना एफबीआयच्या संचालक पदावरून हटवणार का? अशी चर्चाही सुरू झाली, पण ट्रम्प यांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याबरोबर व्हाईट हाऊसनेही या चर्चा फेटाळून लावल्या.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना जेव्हा विचारण्यात आले की, एफबीआयचे संचालक काश पटेल यांना बदलण्याचा काही विचार आहे का? त्यावर ट्रम्प म्हणाले, "नाही. ते चांगलं काम करत आहेत. मला वाटतंय की ते खूप चांगलं काम करत आहेत"

व्हाईट हाऊसनेही काश पटेल यांना हटवले जाण्याबद्दलच्या चर्चा फेटाळल्या आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लेविट यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, पूर्णपणे पेरले गेले आणि खोटी बातमी आहे.

लेविट म्हणाल्या, ट्रम्प यांना बातमी वाचून दाखवली तेव्हा ते हसले आणि म्हणाले की, हे पूर्णपणे खोटं आहे. ये काश आपण एक फोटो काढूयात, जेणेकरून त्यांना दाखवता येईल की तू खूप चांगलं काम करत आहेस." लेविट यांनी फोटोही शेअर केला आहे.

















