इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:11 IST2026-04-07T12:05:04+5:302026-04-07T12:11:07+5:30
US Dangerous Weapons vs Iran : अमेरिकेची ५ घातक शस्त्रे जी इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात

अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता अशा वळणावर आले आहे जिथे संपूर्ण जगाचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढच्या पावलाकडे लागले आहे. आतापर्यंत अमेरिकेने टोमाहॉक क्षेपणास्त्रे आणि 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' सारख्या शस्त्रांनी इराणचे कंबरडे मोडले असले तरी, पेंटागॉनच्या भात्यात अशी काही अस्त्रे अजूनही शिल्लक आहेत ज्यांचा वापर अद्याप करण्यात आलेला नाही. ही शस्त्रे इतकी प्रलयंकारी आहेत की इराणचे सर्वात खोलवर असलेले बंकरही एका झटक्यात उद्ध्वस्त होऊ शकतात.

१. हायपरसोनिक AGM-183 ARRW:
हे अमेरिकेचे सर्वात वेगवान क्षेपणास्त्र मानले जाते. ताशी ६००० किलोमीटर वेगाने धावणारे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला चकवा देण्यात माहीर आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प हे शस्त्र कधीही बाहेर काढू शकतात.

२. 'डार्क ईगल' (Dark Eagle):
हे जमिनीवरून डागले जाणारे हायपरसोनिक शस्त्र आहे. १७०० ते ३५०० किमीची पल्ला गाठण्याची क्षमता असलेले हे शस्त्र ट्रकवरूनही डागता येते. ही क्षेपणास्त्रे प्रामुख्याने रशिया किंवा चीनसाठी राखून ठेवली होती, पण आता इराणच्या वाढत्या आक्रमकतेमुळे अमेरिकेचा हा 'ईगल' हल्ला करण्यासाठी सज्ज झाला आहे.

३. रॅपिड ड्रॅगन (Rapid Dragon):
ही एक अत्यंत स्वस्त पण तितकीच घातक यंत्रणा आहे. यामुळे अमेरिकेचे साधे मालवाहू विमान (Cargo Plane) एका फिरत्या क्षेपणास्त्र तळाचे रूप घेऊ शकते. एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे डागून इराणच्या हवाई संरक्षण दलाला गोंधळात टाकण्यासाठी हे 'ब्रह्मास्त्र' ठरू शकते.

४. महाकाय बंकर बस्टर (GBU-72):
इराणने आपली अनेक महत्त्वाची केंद्रे जमिनीखाली शेकडो फूट खोल बांधली आहेत. पण अमेरिकेचा GBU-72 हा नवीन बंकर बस्टर बॉम्ब या केंद्रांना मातीमोल करण्यासाठीच बनवला गेला आहे.

५. अण्वस्त्रांचा पर्याय:
जरी अमेरिकेने अद्याप अण्वस्त्रांच्या वापराचे कोणतेही संकेत दिले नसले तरी, ट्रम्प यांच्या धोरणांनुसार इराणला अण्वस्त्रधारी होण्यापासून रोखण्यासाठी हा 'शेवटचा पर्याय' म्हणून कायमच खुला आहे.

ट्रम्प यांनी दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपत असताना, अमेरिका आपल्या या राखीव शस्त्रांचा वापर करणार की युद्धविरामाकडे वळणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

















