ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:21 IST2026-04-09T15:18:17+5:302026-04-09T15:21:59+5:30
Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये सुमारे ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला होता. मात्र काही तासांतच या युद्धविरामाचे तीन तेरा वाजताना दिसत आहेत. त्यातच इराणमधील नेत्यांनी इस्लामाबाद येथे होणाऱ्या शांतता चर्चेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ही चर्चाही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये झालेला युद्धविराम तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा युद्धविराम तुटण्यामागची काही कारणं समोर येत आहेत. त्यातील प्रमुख पाच कारणं खालील प्रमाणे आहेत.

अमेरिका आणि इराणमध्ये सुमारे ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला होता. मात्र काही तासांतच या युद्धविरामाचे तीन तेरा वाजताना दिसत आहेत. त्यातच इराणमधील नेत्यांनी इस्लामाबाद येथे होणाऱ्या शांतता चर्चेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ही चर्चाही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये झालेला युद्धविराम तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा युद्धविराम तुटण्यामागची काही कारणं समोर येत आहेत. त्यातील प्रमुख पाच कारणं खालील प्रमाणे आहेत.

लेबेनॉनमधील युद्धविरामाचं उल्लंघन
युद्ध थांबवण्यासाठी लेबेनॉनसह सर्व ठिकाणी तातडीने युद्धविराम व्हावा अशी इराणची अट होती. त्यावर मध्यस्थी करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी होकार दिला होता. मात्र इराणची ही अट लागू होऊ शकली नाही.

इराणच्या हवाई हद्दीत ड्रोनची घुसखोरी
आपल्या हवाई हद्दीत एका ड्रोनने घुसखोरी केली होती, असा दावा इराणने केला आहे. हे ड्रोन फार्स प्रांतातील लार शहरामध्ये पाडण्यात आहे. ड्रोनची ही घुसखोरी म्हणजे इराणच्या हवाई हद्दीचं उल्लंघन होणार नाही, या अटीचा उल्लंघन आहे असा आरोप इराणने केला आहे.

युरेनियम संवर्धनाच्या अधिकारास नकार
अमेरिकेसोबत युद्धविराम करताना आपल्या अणुकार्यक्रमांतर्गत युरेनियम संवर्धनाचा अधिराक मिळावा, अशी अट घातली होती. मात्र अमेरिकेने ही अट मानण्यास नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेली प्रक्षोभक विधानं ही युद्धविराम मोडण्यामागचं महत्त्वाचं कारणं ठरण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास इराणवर हल्ला करता यावा यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका, विमाने आणि सैनिक इराणच्या आसपास तैनात राहतील, असे डोनाल्ड ट्रम्य यांनी सांगितले होते, ही बाब इराणला चिथावणी देणारी ठरत आहे.

युद्धविरामाची घोषणा बनावट होती
इराण आणि अमेरिकेतील युद्धविराम मोडण्यास कारणीभूत ठरणारा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे बुधवारी झालेली युद्धविरामाची झालेली घोषणा ही बनावट असल्याचा करण्यात येत असलेला दावा. त्याचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नाही आहे. तसेच इराण अमेरिका आणि इस्राइलवर युद्धविरामाच्या उल्लंघनाचा आरोप वारंवार करत आहे. तसेच युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाचा खरा करार अद्याप झालेला नाही.

















