इराणच्या या ५ शस्त्रांनी अमेरिका-इस्राईलला आणलंय जेरीस, महाशक्तीला देतंय कडवं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:31 IST2026-03-27T16:24:52+5:302026-03-27T16:31:07+5:30
Iran War News: अमेरिका आणि इस्राइलकडून गेल्या २८ दिवसांपासून इराणवर तुफानी हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्राइलने इराणचे हजारो मिसाईल लॉन्चर, कारखाने आणि लष्करी तळ नष्ट केले आहेत. मात्र एवढं नुकसान सहन केल्यानंतरही इराणने हार मानलेली नाही. उलट आपल्याकडील काही खास शस्त्रांद्वारे इराणने महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आणि इस्राइलला जेरीस आणलं आहे.

अमेरिका आणि इस्राइलकडून गेल्या २८ दिवसांपासून इराणवर तुफानी हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्राइलने इराणचे हजारो मिसाईल लॉन्चर, कारखाने आणि लष्करी तळ नष्ट केले आहेत. मात्र एवढं नुकसान सहन केल्यानंतरही इराणने हार मानलेली नाही. उलट आपल्याकडील काही खास शस्त्रांद्वारे इराणने महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आणि इस्राइलला जेरीस आणलं आहे.

ही शस्त्रे एवढी वेगवान आणि मजबूत आहेत की, अमेरिका आणि इस्राइलच्या अत्याधुनिक डिफेन्स सिस्टिमलाही त्यांनी भांडावून सोडललं आहे. यात स्वस्तातल्या ड्रोनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपर्यंतच्या शस्त्रांचा समावेश आहे. इराण या शस्त्रांचा वापर करून शत्रूची डिफेन्स सिस्टिम वारंवार भेदत आहे. इराणकडे असलेली ही शस्त्रे कोणती आणि त्यांची मारकता किती आहे, याचा घेतलेला हा आढावा.

फतह (हायपरसॉनिक क्षेपणास्त्र)
इराणकडे असलेली फतह-१ आणि फतह-२ ही क्षेपणास्त्रे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांमध्ये गणती जातात. ही क्षेपणास्त्रे ताशी १८ हजार ५२२ किमी वेगाने उडतात. सर्वसाधारणपणे क्षेपणास्त्रेही सरळ रेषेत जातात. मात्र फतह क्षेपणास्त्रामध्ये वाटेत मध्येच दिशा बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे इस्राइल आणि अमेरिकेकडील पॅट्रियट किंवा आयरन डोमसारख्या डिफेन्स सिस्टिम या क्षेपणास्त्राला रोखू शकत नाहीत.

झोल्फागार ( बॅलेस्टिक क्षेपणास्त्र)
झोल्फागार हे इराणकडील घन इंधन असलेलं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यासाठी अवघी काही मिनिटेच लागतात. द्रव इंधन असलेल्या जुन्या क्षेपणास्त्रांना तयार होण्यासाठी काही तास लागतात. मात्र झोल्फागारला ट्रकवर ठेवून प्रक्षेपित करता येतं. इराणने युद्धादरम्यान, या क्षेपणास्त्राचा ७६व्या आणि ७७ व्या व्हेवमध्ये वापर केला आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकन तळ आणि इस्त्राइली तळांना लक्ष्य करून डागली जात आहेत.

शाहेद-१३६ (अॅटॅक ड्रोन)
शाहेद-१३६ हे या युद्धामध्ये इराणकडून वापरण्यात येत असलेलं सर्वात स्वस्त आणि धोकादायक हत्यार आहे. हे छोटे ड्रोन स्वस्तातलं इंजिन आणि सामान्य पार्टपासून तयार केले जातात. या एका ड्रोनची किंमत केवळ काही हजार डॉलर आहे. तर या ड्रोनला रोखण्यासाठी अमेरिकेला लाखो डॉलरची क्षेपणास्त्रे वापरावी लागत आहेत. हे ड्रोन कमी उंचीवरून उड्डाण करतात. त्यामुळे ते रडारला ते सहजासहजी दिसत नाहीत. इराणने अशा प्रकारचे हजारो ड्रोन तयार केले आहेत. तसेच इराणकडून शत्रूविरोधात या ड्रोनच्या झुंचीच्या झुंडी सोडण्यात येत आहेत.

शाहाब-३ ( मीडियम रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र)
शाहाब-३ हे इराणचं जुनं पण विश्वसनीय क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता १९०० किमीपेक्षा अधिक आहे. म्हणजेच इस्त्राइल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळ या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. तसेच वॉरहेडमध्ये क्लस्टर बॉम्बही घेऊन जाऊ शकते.

खोर्रमशहर-४ (बॅलेस्टिक क्षेपणास्त्र)
खोर्रमशहर-४ हे इराणचं लांब पल्ल्याचं शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे. यात अनेक वॉरहेड लावता येतात. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकतं. याची मारक क्षमता २ हजार किमी एवढी आहे. हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक वेगाने लक्ष्याजवळ पोहोचते. इराणने अमेरिकन नौदल आणि इस्राइली हवाई तळांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने हे क्षेपणास्त्र तयार केलं आहे.

या पाच हत्यारांच्या जोरावर इराणने अमेरिका आणि इस्राइलविरुद्धचं युद्ध हार न मानता सुरू ठेवलं आहे. तसेच ही शस्त्रास्त्रे अमेरिका आणि इस्राइलच्या डिफेन्स सिस्टिमला जेरीस आणत असल्याने परिसरातील तणाव आणखीनच वाढला आहे.

















