By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:38 IST
1 / 6अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतर शनिवारी इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले आहेत. यादरम्यान, इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू झाले असून, इराणकडून इस्राइलसोबतच संयुक्त अरब अमिराती, बहरीनसह इतर आखाती देशांनांही लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे इराण या आखाती देशांना का लक्ष्य करतोय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 2 / 6इस्राइल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण इस्राइलबरोबरच इतर मुस्लिम आखाती देशांना लक्ष्य करत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या देशांमध्ये असलेले अमेरिकेचे तळ हे होय. संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार, कुवेत या देशांमध्ये अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत. त्यामुळे या तळांना लक्ष्य करण्यासाठी इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले करण्यात आले आहेत. 3 / 6या आखाती देशांपैकी बहरीन येथे अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे मुख्यालय आहे. तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये अल दफ्रासारखा मोठा लष्करी तळ आहे. तर कतारमध्येही अल उदेद नावाचा पश्चिम आशियातील अमेरिकेचा मोठा तळ आहे. 4 / 6इस्राइल आणि अमेरिकेने केलेल्या आक्रमणानंतर आपल्या आसपासच्या आखाती देशांवर हल्ले करण्यामागे इराणची खास रणनीतीही दिसून येत आहे. आपण इस्राइल आणि अमेरिकेला फार रोखू शकत नाही, याची पुरेपूर जाणीव इराणला आहे. त्यामुळे अमेरिकेचे तळ असलेल्या आणि अमेरिकेचे मित्र असलेल्या या देशांना लक्ष्य करून युद्धाची व्याप्ती वाढवण्याचा आणि त्या माध्यमातून अमेरिकेवर दबाव आणण्याचा इराणचा प्रयत्न आहे. 5 / 6यूएई, बहरीन यांसारख्या आखाती देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटन, व्यापारावर अवलंबून आहे.त्यामुळे या देशांमधील विमानतळ आणि व्यावसायिक केंद्रांना लक्ष्य करून तिथे अस्थिरता निर्माण करण्याचा इराणचा इरादा आहे.त्यामुळे हे देश अमेरिकेवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणतील, असा अमेरिकेचा इरादा आहे. 6 / 6सध्या इस्राइल आणि अमेरिका यांच्याविरुद्ध सुरू असलेला संघर्ष ही इराणमधील सत्ताधाऱ्यांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई हे इस्राइल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मारले गेल्याने इराणमधील रिव्होल्युशनरी गार्ड बिथरले आहेत. तसेच या रिव्होल्युशनरी गार्डने भयानक बदला घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात इराणकडून इस्राईल आणि अमेरिकेसह आजूबाजूच्या आखाती देशात तीव्र हल्ले होण्याची शक्यता आहे.